“मी जर जनतेच्या मनात असेन, तर मोदीही माझे राजकारण संपवू शकत नाहीत,” असे खळबळजनक वक्तव्य भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवड्यानिमित्त अंबाजोगाई (जि. बीड) येथे आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडेंची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “मोदींना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मीपण वंशवादाचे प्रतीक आहे. मला कुणी संपवू शकत नाही. मी जर जनतेच्या मनावर राज्य केले आणि जनतेच्या जीवनासाठी चांगले कार्य केले, तर मला मोदीही संपवू शकणार नाहीत.”
पंकजांचा भाव समजून घ्या - मुनगंटीवार
पंकजांच्या वक्तव्यावर भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा भाव स्पष्ट होता की, वंशवादाचे राजकारण म्हणजे पिता मुख्यमंत्री आहे म्हणून कर्तृत्व नसताना मुलगा एखाद्या मंत्रिपदावर जातो किंवा पात्रता असो वा नसो, कुटुंबातील सदस्यांना पदे मिळतात, त्यांना फेवर केले जात असेल तर नरेंद्र मोदी हे वंशवादाच्या विरोधात आहेत; मात्र जर जनतेने निवडणुकीत स्थान आणि सन्मान दिला तर वंशवादाच्या बाहेर जाऊन जनतेत हे प्रतीक मिळू शकते, हा अर्थ त्यांच्या वक्तव्यातून प्रतिध्वनित होतो.”