नवी दिल्ली : 'नीट' पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी येथील जंतरमंतरवर बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना २१ व्या दिवशी शनिवारी दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सफदरजंग रुग्णालयात हलवले. या कारवाईचा विरोधी तीव्र निषेध केला असून ही सरकारची दडपशाही असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
आंदोलनाची जागा सोडण्याचे पोलिसांचे आवाहन 'कॉकरोच जनता पार्टी' ने फेटाळून लावले असून अभिजित दीपके यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. वांगचुक यांनी आपले उपोषण 'सोडलेले नाही' आणि ते रुग्णालयातूनच ते सुरू ठेवतील, असेही पार्टीतर्फे जाहीर करण्यात आले.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीची मागणी करणाऱ्या या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, २० जुलै रोजी संसदेवरील मोर्चा काढण्यावर ते ठाम आहेत.
रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दुपारी ३.३० वाजता जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले की, वांगचुक यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असून चयापचयाशी संबंधित प्रकृती बिघाडाची लक्षणे दिसत आहेत, तरीही त्यांनी सलाईन, ओआरएस आणि इतर औषधे घेण्यास नकार दिला आहे. वांगचुक यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात असून, त्यांच्या आरोग्याच्या हितासाठी उपचार घेण्याबाबत त्यांचे समुपदेशन केले जात आहे, असेही रुग्णालयाने सांगितले.
दरम्यान, दिपके यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. 'मला दिल्ली पोलिसांनी मारहाण केली आणि ताब्यात घेतले. एका मित्राच्या घरी फ्रेश होण्यासाठी गेलो असताना पोलिसांनी आपल्याला मारहाण केली व काही काळ ताब्यात ठेवले असा आरोप दिपके यांनी केला.
दरम्यान, विरोधी पक्षांनी या पोलिसी कारवाईचा निषेध केला आणि सरकार लोकशाही स्वातंत्र्य पायदळी तुडवत असल्याचा, विरोध दडपण्याचा आणि संवादाऐवजी बळाचा वापर करत असल्याचा आरोप केला.
'आप'चे राष्ट्रीय निोजक अरविंद केजरीवाल, ज्यांनी गुरुवारी वांगचुक यांची भेट घेतली होती, त्यांनी नागरिकांना जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले.
'केवढी ही शरमेची गोष्ट!' भारतातील लोकशाही बळाचा वापर करून अत्यंत निर्लज्जपणे कशी पायदळी तुडवली जात आहे, हे जग पाहत आहे,' अशी पोस्ट शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी 'एक्स'वर केली. सीपीएम नेत्या वृंदा करात यांनी आरोप केला की, ही कारवाई म्हणजे 'लोकशाही आणि घटनात्मक मूल्यांना चिरडण्याचा' आणि जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न आहे.
भाजपने मात्र हे आरोप फेटाळून लावले. प्रशासनाने संवेदनशीलतेने काम केले असून, न्यायालयाचे निर्देश आणि जीवन वाचवण्याची गरज यामध्ये समतोल साधला आहे, असा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला.
वैद्यकीय सेवेत पारदर्शकतेचा अभाव-गीतांजली आंग्मो
वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच, वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंग्मो यांनी त्यांच्या वैद्यकीय सेवेमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत, त्यांच्या संमतीशिवाय कोणत्याही प्रकारचे उपचार न करण्याची विनंती रुग्णालयाला केली.
मोदी सरकारची मुख्य सूत्रे 'असत्य' आणि 'हिंसा' - राहुल
नवी दिल्ली: अहिंसक मार्गाने उपोषणाला बसलेले आंदोलक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवरून हटवणे अत्यंत चुकीचे आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली. तसेच नरेंद्र मोदी सरकारची मुख्य सूत्रे ही 'असत्य आणि हिंसा' आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. जंतरमंतर येथील पोलिसांच्या या कारवाईवर काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला असून, वांगचुक यांना तेथून हलवणे हा देशाची लोकशाही आणि संविधानावरील एक 'कलंक' असल्याचे म्हटले आहे.
अशी केली उचलबांगडी
सकाळी ७ च्या सुमारास संसदेपासून अवघ्या २-३ किलोमीटर अंतरावर असलेल्या आंदोलनस्थळी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. पोलिसांचा एक मोठा ताफा तिथे दाखल झाला. अत्यंत अशक्त दिसणारे वांगचुक ज्या मंचावर विश्रांती घेत होते, त्या मंचाभोवती निमलष्करी दलाच्या जवानांनी कडे केले. पांढऱ्या चादरींचा पडदा म्हणून वापर करत पोलीस कर्मचारी वांगचुक यांच्या दिशेने धावले. काही आंदोलक वांगचुक यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झटापट करत होते, पण पोलिसांनी वांगचुक यांना उचलून रुग्णवाहिकेत नेले.
दीपके यांच्यावर शाईफेक
वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर दीपके हे त्याबाबत आंदोलकांना माहिती देत होते. त्यावेळी एका महिलेने दीपके यांच्यावर शाईफेक केली. तिचे नाव बरखा त्रेहान असल्याचे कळते.
ठाकरे यांचे आज आंदोलन
नागपूर : सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांना समर्थन देण्यासाठी रविवारी मुंबईत आंदोलन करणार असल्याचे उद्धव ठाकरे जाहीर केले आहे. मी पहिले आंदोलन करेन आणि त्यांना नंतर दिल्लीत जाऊन भेटेल, असेही ठाकरे म्हणाले. सर्व पक्षांना मी उद्याच्या आंदोलनात आमंत्रित करतो. देशासाठी या आंदोलनात सहभागी व्हा, असेही ठाकरे म्हणाले.