राष्ट्रीय

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

एका प्रवाशाने 'एक्स'वर शेअर केलेल्या माहितीनुसार, प्रवासी विमानात बसल्यानंतर काही वेळातच केबिनमधील तापमान वाढू लागले.

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या (SpiceJet) SG 105 विमानात मंगळवारी (दि. ११) टेकऑफपूर्वीच केबिनमधील तापमान वाढले. यामुळे प्रवाशांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. काही प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाल्याचा दावा करण्यात आला असून, परिस्थितीमुळे प्रवाशांनी विमानाच्या उड्डाणास विरोध केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विमानात बसल्यानंतर वाढला उकाडा

नवी दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह विविध वयोगटांतील प्रवासी होते. एका प्रवाशाने 'एक्स'वर शेअर केलेल्या माहितीनुसार, प्रवासी विमानात बसल्यानंतर काही वेळातच केबिनमधील तापमान वाढू लागले. काही वेळातच उकाडा इतका वाढला की, प्रवाशांना अस्वस्थ वाटू लागल्याचा दावा करण्यात आला.

प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास

केबिनमधील तापमान वाढल्याने अनेक प्रवासी घामाने भिजल्याचे सांगण्यात आले. काही प्रवाशांना श्वास घेण्यासही त्रास जाणवू लागल्याचा दावा करण्यात आला. विमान रनवेच्या दिशेने नेण्यात आले असतानाही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याने प्रवाशांनी चिंता व्यक्त केली.

प्रवाशांचा उड्डाणाला विरोध

परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी विमान उड्डाण करू नये, अशी भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. समस्या दूर होईपर्यंत विमानाला उड्डाण करण्यास परवानगी देणार नसल्याचे प्रवाशांनी स्पष्ट केले. त्यामुळे विमानातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले.

पोलिसांना बोलावण्याचा इशारा

दरम्यान, प्रवाशांनी परिस्थितीविरोधात आवाज उठवल्यानंतर विमानाच्या कॅप्टन आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून कथितरीत्या आरडाओरड करण्यात आल्याचा आरोप एका प्रवाशाने केला आहे. आंदोलन सुरू ठेवल्यास पोलिसांना बोलावले जाऊ शकते, असा इशारा देण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

तांत्रिक बिघाडाचा प्रवाशांचा दावा

विमानातील अस्वस्थतेमागे तांत्रिक समस्या असल्याचा दावा काही प्रवाशांनी केला. त्यानंतर त्यांनी विमानतळावर निषेध नोंदवत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.

'विमानात हवा खेळती नव्हती, मुलं रडत होती'

या घटनेबाबत प्रवासी लेशपाल यांनी आपला अनुभव सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्पाईसजेटचे विमान रात्री ९.५५ वाजता नियोजित होते, मात्र रात्री १०.३० वाजता बोर्डिंग सुरू झाले. विमानात बसल्यानंतर सुमारे अर्धा तास केबिनमध्ये हवा खेळती नसल्याने आणि एसी बंद असल्याने प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काही वेळातच उकाडा असह्य झाला आणि प्रवाशांचे कपडे घामाने भिजल्याचा दावा त्यांनी केला.

लेशपाल यांच्या म्हणण्यानुसार, "मुलं रडत होती, गर्भवती महिलांनाही त्रास होत होता. परिस्थिती पाहता आम्ही विमानाच्या उड्डाणाला विरोध केला. त्यानंतर स्पाईसजेटच्या तांत्रिक पथकाने तपासणी केली आणि विमान उड्डाण करण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगितले," असा दावा त्यांनी केला. त्यानंतर प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले आणि पहाटे सुमारे ५ वाजता दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आल्याचेही लेशपाल यांनी सांगितले. विमानाच्या तांत्रिक तपासणीसाठी आपण वारंवार आग्रह करत होतो, असेही त्यांनी नमूद केले.

प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

या घटनेमुळे विमानातील प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विमानातील तापमान नियंत्रणात ठेवणे, प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि तांत्रिक अडचणींच्या वेळी योग्य ती खबरदारी घेणे, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या घटनेबाबत स्पाइसजेटकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आल्यास त्यातून परिस्थितीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : घाटकोपरमध्ये दरड कोसळली; ६ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू, Video

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

मुंबईत अग्नितांडव! विलेपार्लेतील उच्चभ्रू इमारतीला भीषण आग; अडीच वर्षांच्या चिमुरड्यासह दोघांचा मृत्यू, VIDEO