प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात संगम तीरावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. बुधवार अर्थात आजच्या मौनी अमावास्येनिमित्त शाही स्नानासाठी रात्रीपासूनच भाविकांची प्रचंड मोठी गर्दी येथे झाली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी-बुधवारी रात्री दीड-दोनच्या सुमारास संगम किनाऱ्यावर अचानक गर्दी वाढल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. गर्दीत धक्काबुक्की झाली, गोंधळ उडाला, पळापळ झाली आणि काहीजण जमिनीवर पडले. तर, एका अफवेनंतर ही घटना घडल्याचीही शक्यता वर्तवली जात असली तरी अद्याप कशालाही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. घटनेत मृत्यू आणि जखमी झालेल्या लोकांचा अधिकृत आकडाही अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, काही टीव्ही माध्यमांच्या वृत्तानुसार, १४ हून अधिक भाविकांचा यात मृत्यू झाला आहे. तर, किमान ३० ते ४० भाविक जखमी असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करुन परिस्थितीबाबत माहिती घेतली आणि तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, चेंगराचेंगरीनंतर सध्या विविध आखाड्यांच्या विशेष मार्गांनी सामान्य लोकांना बाहेर काढले जात असून परिस्थिती नियंत्रणात आल्याचे समजते.