मुंबई : भारतरत्न, घटनातज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांचा जनसागर चैत्यभूमीवर उसळला आहे. चैत्यभूमीवर दर्शनासाठी हजारो लोक दादर आणि परळ रेल्वे स्थानकावर गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे दर्शनाची रांग प्रभादेवीपर्यंत गुरुवारी संध्याकाळी पोहोचली होती.
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी दरवर्षी ३ डिसेंबरपासून आंबेडकरी अनुयायी देशभरातून येत असतात. सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन असला तरी ३ डिसेंबरपासूनच हजारोंच्या संख्येने लोक दादर परिसरात जमू लागले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यातील अनुयायांसह महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात अनुयायी दाखल झाले आहेत.
या अनुयायांसाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने निवारा मंडप व्यवस्था केली गेली असली तरी या निवारा मंडपाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात लाठीमार करावा लागला. पोलिसांनी गर्दीला आवरण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी अनेक जण जखमी झाले. अनेक जण बेशुद्ध पडले. तेव्हा पोलिसांनी सीपीआर देऊन व पायाचे तळवे घासून काही जणांना वाचवले. या घटनेत महिलेसहित दोघांचा मृत्यू झाला, तर काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.