७८% लोकांच्या रक्तात कीटकनाशकांचे अंश; बंगळुरूस्थित संस्थेच्या अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष, भविष्यात आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होण्याची शक्यता 
राष्ट्रीय

७८% लोकांच्या रक्तात कीटकनाशकांचे अंश; बंगळुरूस्थित संस्थेच्या अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष, भविष्यात आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होण्याची शक्यता

भारतातील शहरी लोकसंख्येपैकी तब्बल ७८ टक्के लोकांच्या रक्तामध्ये कीटकनाशकांचे अंश आढळून आले आहेत. त्यामुळे भविष्यात आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, असे निष्कर्ष बंगळुरूस्थित ‘गट हेल्थ स्टार्टअप मायक्रोबायो टेक्स’ यांनी केलेल्या ताज्या अभ्यासात आढळून आले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतातील शहरी लोकसंख्येपैकी तब्बल ७८ टक्के लोकांच्या रक्तामध्ये कीटकनाशकांचे अंश आढळून आले आहेत. त्यामुळे भविष्यात आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, असे निष्कर्ष बंगळुरूस्थित ‘गट हेल्थ स्टार्टअप मायक्रोबायो टेक्स’ यांनी केलेल्या ताज्या अभ्यासात आढळून आले आहेत. हा अभ्यास विविध शहरांतील २०० जणांचे रक्तनमुने तपासून करण्यात आला. त्यामध्ये कीटकनाशके, प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स), स्टिरॉइड्स आणि तथाकथित ‘फॉरएव्हर केमिकल्स’ यांसारख्या छुप्या रासायनिक अंशांचा आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या अभ्यासानुसार, तपासलेल्या ७८ टक्के लोकांमध्ये कीटकनाशकांचे अंश आढळले, तर ३६ टक्के लोकांमध्ये तीन किंवा अधिक कीटकनाशकांचा संपर्क आढळला. त्यामुळे एकत्रित (क्युम्युलेटिव्ह) परिणाम होऊन गंभीर आरोग्य धोके संभवतात. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, ‘दैनंदिन अन्नसेवन, प्लास्टिकचा वापर, भूजल आणि पर्यावरणीय प्रदूषण यांद्वारे हे विषारी घटक शरीरात प्रवेश करत आहेत आणि त्यांचा व्यापक संपर्क दिसून येत आहे’.‘फॉरएव्हर केमिकल्स’ ही कृत्रिम, मानवनिर्मित संयुगे असून ती पाणी, उष्णता आणि तेलरोधक गुणधर्मांमुळे नॉन-स्टिक भांडी, अन्नपॅकेजिंग, जलरोधक कपडे आणि कोटिंग्ज यांसारख्या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. अभ्यासात नमूद केले आहे की, यांपैकी अनेक संयुगे मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात, म्हणून काहींवर बंदी घालण्यात आलेली आहे.

५४ टक्के नमुन्यांमध्ये प्रतिजैविकांचे अंश

त्याशिवाय, ५४ टक्के नमुन्यांमध्ये प्रतिजैविकांचे अंश आढळले. अशा प्रकारचा संपर्क अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स (प्रतिजैविक प्रतिकारशक्ती), उपचारांना कठीण होणारे संसर्ग आणि आतड्यांतील सूक्ष्मजीव संतुलन बिघडवणे यांस कारणीभूत ठरू शकतो, ज्यामुळे चयापचयाशी संबंधित विकार उद‌्भवू शकतात. अभ्यासात असेही आढळले की ३९ टक्के लोकांमध्ये स्टिरॉइड्सचे अंश होते. हे संयुग अंतःस्रावी तंत्रात बिघाड (एंडोक्राइन डिसरप्शन) आणि कर्करोगाचा वाढता धोका निर्माण करू शकतात.

कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता

दरम्यान, ३८ टक्के नमुन्यांमध्ये ‘फॉरएव्हर केमिकल्स’ आढळले. हे दीर्घकाळ टिकणारे रसायन कर्करोगाचा धोका वाढवू शकतात आणि वंध्यत्व, थायरॉईड विकार, हार्मोन दमन, उच्च कोलेस्टेरॉल, यकृताचे नुकसान आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस यांसारख्या समस्यांशी संबंधित आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे, १७ टक्के नमुन्यांमध्ये तीन वेगवेगळ्या श्रेणींमधील १० किंवा अधिक विषारी घटक आढळले, ज्यामुळे लपलेला दीर्घकालीन संपर्क स्पष्ट होतो.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग