राष्ट्रीय

सुभाषचंद्र बोस यांना ‘राष्ट्रपुत्र’ घोषित करा; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

स्वातंत्र्यलढ्यातील थोर नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' घोषित करावे आणि भारताच्या स्वातंत्र्याचे श्रेय आझाद हिंद फौजेला द्यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. याचिकाकर्त्याच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायालयाने त्यांना "सुधारणा न होणारे" असे संबोधले.

Swapnil S

नवी दिल्ली : स्वातंत्र्यलढ्यातील थोर नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' घोषित करावे आणि भारताच्या स्वातंत्र्याचे श्रेय आझाद हिंद फौजेला द्यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. याचिकाकर्त्याच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायालयाने त्यांना "सुधारणा न होणारे" असे संबोधले.

न्यायालयाची कडक टिप्पणी

सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जोयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते पिनाकपाणी मोहंती यांना न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल कडक शब्दांत फटकारले. आम्ही तुमची सर्वोच्च न्यायालयातील एन्ट्री बंद करू. यापूर्वीही आम्ही तुमची हीच मागणी फेटाळली होती, अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी मोहंती यांना ताकीद दिली.

याचिकाकर्त्याचा युक्तिवाद

याचिकाकर्ते मोहंती यांनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या निरर्थक याचिका दाखल केल्याबद्दल त्यांना न्यायालयातर्फे समज देण्यात आली होती. जेव्हा सरन्यायाधीशांनी त्यांना मागील याचिकेबद्दल विचारले, तेव्हा मोहंती यांनी हिंदीत उत्तर दिले की, 'ये बार अलग है' (यावेळी प्रकरण वेगळे आहे). या याचिकेचा मसुदा कोणी तयार केला, असे विचारल्यावर त्यांनी एका 'मुखर्जी सरांचे' नाव घेतले, ज्यामुळे खंडपीठाने अधिकच संताप व्यक्त केला.

नेमकी मागणी काय?

पिनाकपाणी मोहंती यांनी दाखल केलेल्या या जनहित याचिकेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अधिकृतपणे 'राष्ट्रपुत्र' घोषित करावे आणि १९४७ मध्ये भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे प्रामुख्याने नेताजींच्या आझाद हिंद फौजेमुळेच मिळाले आहे, अशी अधिकृत मान्यता द्यावी, आदी मागण्यात याचिकेत करण्यात आल्या आहेत.

भविष्यात बंदी

केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या याचिका दाखल केल्या जात असल्याचे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने मोहंती यांची याचिका फेटाळून लावली. तसेच, या याचिकाकर्त्याने भविष्यात कोणतीही जनहित याचिका दाखल केल्यास ती स्वीकारू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला देण्यात आले आहेत.

मुंबईत उद्या पाणीपुरवठा खंडित; काही भागात कमी दाबाने पाणी

Tanvi Kolte : मराठी जिंकलं, आता 'बिग बॉस हिंदी'मध्ये एंट्री? विजेत्या तन्वी कोलतेने दिलं उत्तर; म्हणाली - "ऑफर मिळाली..."

IPL 2026 : गोलंदाजांची आज अग्निपरीक्षा; सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांमध्ये जुगलबंदी

रुग्णांसाठी एकीकृत कार्यपद्धती लागू करावी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Mumbai : नगरसेवकांना महिना १ लाखांचे मानधन द्या! सपा नगरसेविकेचे महापौरांना पत्र