नवी दिल्ली : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाचा १२ जून रोजी झालेला अपघात ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे, त्यात तुमच्या मुलाचा दोष आहे, असे तुम्ही समजू नका. कोणीही तुमच्या मुलाला दोष देऊ शकत नाही. भारतात कोणीही असे मानत नाही की, ही वैमानिकाची चूक होती, असे न्या. सूर्य कान्त यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
या भीषण अपघाताची चौकशी निष्पक्षपणे व्हावी, अशी मागणी करत दिवंगत वैमानिक सुमित सबरवाल यांच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुष्कर राज सबरवाल (९१) यांनी न्यायालयात सांगितले की, तांत्रिक बिघाडांकडे दुर्लक्ष करुन संपूर्ण दोष वैमानिकावर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यानंतर वरील बाब न्या. सूर्य कान्त यांनी स्पष्ट केली.
अनेकांचा मृत्यू
लंडनला निघालेले एअर इंडिया चे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले. हे विमान मेघाणीनगर परिसरातील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेसवर आदळले. या दुर्घटनेत पायलट, क्रू मेंबर्स आणि प्रवासी मिळून २४१ लोकांचा मृत्यू झाला, तर फक्त एक प्रवासी बचावला.
न्यायालयाची नाराजी
२२ सप्टेंबरच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशी अहवालातील निवडक भाग माध्यमात प्रसिद्ध करून पायलटवर दोषारोप लावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाने म्हटले होते की, चौकशी अजून पूर्ण झालेली नाही, त्यामुळे गोपनीयता राखणे अत्यावश्यक आहे. तपास अहवालात कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरवरील संभाषणाचा उल्लेख आहे. त्यात एक पायलट विचारतो, फ्युएल का कट-ऑफ केले, त्यावर दुसरा पायलट म्हणतो, मी केले नाही. या संभाषणाचा चुकीचा अर्थ लावून वैमानिकांना जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याचे सबरवाल कुटुंबाचे म्हणणे आहे.