समय रैनासह ५ कॉमेडियन्सना 'सर्वोच्च' दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणातील सर्व FIR रद्द 
राष्ट्रीय

समय रैनासह ५ कॉमेडियन्सना 'सर्वोच्च' दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणातील सर्व FIR रद्द

सुनावणीदरम्यान पाचही कॉमेडियन्सनी दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी केलेल्या उपक्रमांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात आली.

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : 'इंडियाज गॉट लेटेंट' कार्यक्रमातील दिव्यांग व्यक्तींबाबत कथित असंवेदनशील टिप्पणीप्रकरणी कॉमेडियन समय रैनासह पाच जणांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. १४) मोठा दिलासा दिला. या प्रकरणातील फौजदारी कार्यवाही रद्द करत न्यायालयाने संबंधितांच्या दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

समय रैनासह पाच जणांना दिलासा

समय रैनासह विपुल गोयल, बलराज परमजीत सिंग घई, सोनाली ठक्कर ऊर्फ सोनाली आदित्य देसाई आणि निशांत जगदीश तन्वर यांच्याविरोधातील फौजदारी कार्यवाही रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित अन्य कार्यवाहीही रद्द केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

दिव्यांगांच्या मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक

सुनावणीदरम्यान पाचही कॉमेडियन्सनी दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी केलेल्या उपक्रमांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात आली. पुण्यात बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन, निधी उभारण्यासाठी आणखी कार्यक्रमांचे नियोजन तसेच संबंधित स्वयंसेवी संस्थेसोबत काम करण्याची तयारी याची न्यायालयाने दखल घेतली.

स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफीने (SMA) प्रभावित व्यक्तींना मदत करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती. या प्रयत्नांमधून न्यायालयाच्या आधीच्या निर्देशांचे पालन झाल्याचे दिसून येत असल्याचे खंडपीठाने नमूद केले.

'प्रामाणिक प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम'

न्यायालयाने या तरुणांच्या प्रयत्नांचे कौतुक करत सकारात्मक दिशेने काम केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात, असे निरीक्षण नोंदवले. हे सर्व तरुण हुशार असून, त्यांनी सकारात्मक दिशेने काम सुरू केले असेल तर त्यातून सकारात्मक परिणाम निश्चितच दिसतील, असे खंडपीठाने म्हटले.

अनेक तक्रारींनंतर सुरू झाला होता वाद

'इंडियाज गॉट लेटेंट' कार्यक्रमातील काही वक्तव्यांवरून वाद निर्माण झाल्यानंतर समय रैना आणि अन्य व्यक्तींविरोधात विविध राज्यांमध्ये अनेक एफआयआर दाखल करण्यात आले होते. अश्लीलता, असभ्य भाषा आणि दिव्यांग व्यक्तींबाबत असंवेदनशील टिप्पणी केल्याचे आरोप करण्यात आले होते.

या प्रकरणात यूट्यूबर रणवीर अलाहबादियानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या स्वतंत्र याचिकेवरील कार्यवाही अद्याप प्रलंबित आहे.

ऑनलाइन कंटेंटवरील नियंत्रणाचा मुद्दा

पाच कॉमेडियन्सविरोधातील फौजदारी कार्यवाही रद्द झाली असली, तरी ऑनलाइन कंटेंटवरील नियंत्रणाचा व्यापक मुद्दा अद्याप खुला आहे. भविष्यात योग्य निर्देश निश्चित करताना दिव्यांग व्यक्तींच्या सूचनांचाही विचार करण्याची शक्यता न्यायालयाने व्यक्त केली आहे.

न्यायालयाने रैनाला सुनावले होते

या कायदेशीर प्रकरणादरम्यान समय रैना यांनी कॅनडातील एका कार्यक्रमात न्यायालयीन कार्यवाहीचा उल्लेख केल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना इशारा दिला होता. न्यायालयाला हलक्यात घेऊ नका, अशा शब्दांत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी त्यांना सुनावले होते.

जुलैमध्येही न्यायालयाची नाराजी

जुलै २०२६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आधीच्या निर्देशांचे कथित पालन न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी रैना आणि अन्य संबंधितांचा उल्लेख '‘स्वयंघोषित युवा आयकॉन' असा करत न्यायालयाने प्रत्येकावर ३ लाख रुपयांचा दंड लावला होता. मात्र, त्यानंतर दिव्यांगांच्या मदतीसाठी केलेल्या उपक्रमांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात आली आणि प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

SIR विरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; CJP च्या आंदोलनाला पाठिंबा, ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा

...तर ठाण्यातील क्लस्टरवर विश्वास कसा ठेवायचा? केदार दिघेंचा महापालिकेला सवाल

Kolhapur : भरधाव Ertiga ची दुचाकीला जबर धडक; पती-पत्नी थेट हवेत; एकजण जागीच ठार, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

Mumbai : १४ फूट उंच झोपड्यांच्या कारवाईवरून विरोधक आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंच्या शिष्टमंडळांनी घेतली आयुक्तांची भेट

फिल्मसिटीतील मैदानाला GMLR चा फटका; १७४ कोटी नुकसानभरपाई देण्याची महामंडळाची मागणी, BMC कडून २० कोटी देण्याचा प्रस्ताव