

नवी दिल्ली : 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कॉमेडियन समय रैनाला दणका दिला आहे. न्यायालयासमोर दिलेल्या आश्वासनांचे पालन न करता "कोर्टाची दिशाभूल केली, आता त्याचे परिणाम भोगा," अशा कठोर शब्दांत ताशेरे ओढत न्यायालयाने रैनाला ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला. याच प्रकरणातील अन्य चार विनोदी कलाकारांवरही समान दंडाची कारवाई करण्यात आली असून, १५ दिवसांच्या आत पालन प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दिव्यांगांवरील विनोदांमुळे सुरू झाला वाद
दिव्यांग व्यक्तींविषयी करण्यात आलेल्या असंवेदनशील विनोदांमुळे 'इंडियाज गॉट लेटेंट' हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या प्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने समय रैना, विपुल गोयल, बलराज परमजीत सिंह घई, सोनाली ठक्कर आणि निशांत जगदीश तन्वर यांच्यावर प्रत्येकी ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला.
'न्यायालयाची दिशाभूल केली'
'लाईव्ह लॉ' च्या वृत्तानुसार, सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहन यांच्या खंडपीठाने समय रैनाच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयासमोर दिलेल्या हमीचे त्याने उघडपणे उल्लंघन केले असून, न्यायालयाची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.
१५ दिवसांत पालन प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने समय रैनाला दोन आठवड्यांच्या आत ३ लाख रुपयांचा दंड जमा करण्याचे आदेश दिले. तसेच १५ दिवसांच्या आत पालन प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले असून, आदेशाचे पालन न झाल्यास पुढील कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.
SMA फाउंडेशनशी संपर्कच नाही
सुनावणीदरम्यान, वरिष्ठ वकील अपराजिता सिंह यांनी न्यायालयाला सांगितले की, न्यायालयाच्या आधीच्या आदेशानंतरही समय रैनाने क्युअर एसएमए फाउंडेशन किंवा स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी (SMA) ग्रस्त व्यक्तींशी कोणताही संपर्क साधलेला नाही. न्यायालयाच्या आदेशांबाबत त्याचा दृष्टिकोन अत्यंत निष्काळजी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
India's Got Latent Season 2 चाही उल्लेख
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाला माहिती दिली की, समय रैना 'इंडियाज गॉट लेटेंट सीझन २' चे सूत्रसंचालन करत आहे. नव्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्याने "लिंबू-मिरची"चा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे न्यायालयीन कारवाईचा संदर्भ दिल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
'आता त्यांना परिणाम भोगू द्या'
समय रैनाच्या भूमिकेवर टीका करत सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, "देशाबाहेर बसलो म्हणजे न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाहेर आहोत, असे त्यांना वाटते. आता त्यांना त्याचे परिणाम भोगू द्या." सार्वजनिक जीवनात इतरांचा आदर राखणे आवश्यक असून, लोकांचा अपमान करून लोकप्रियता मिळवता येत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
सुधारणा करण्याची संधी
यापूर्वी न्यायालयाने संबंधित विनोदी कलाकारांना दिव्यांग व्यक्तींबाबत जनजागृती करणारे विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची संधी दिली होती. तसेच दुर्मीळ आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी निधी उभारण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. मात्र, त्या हमींची अंमलबजावणी न झाल्याने न्यायालयाने अखेर दंडात्मक कारवाई केली.