नवी दिल्ली : दोन संमतीधारक अविवाहित प्रौढ व्यक्तींमधील शारीरिक संबंधांच्या आधारे संबंधित व्यक्तीच्या चारित्र्यावर संशय घेतला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
एका अयशस्वी प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या फौजदारी खटल्याचा दाखला देत तेलंगणा राज्य पोलीस भरती मंडळाने एका उमेदवाराची पोलीस कॉन्स्टेबल पदावरील निवड रद्द केली होती. न्या. मनमोहन आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय रद्दबातल ठरवत संबंधित उमेदवाराला पोलीस कॉन्स्टेबल पदावर नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
खंडपीठाने स्पष्ट केले की, दोन संमतीधारक अविवाहित प्रौढांमधील शारीरिक संबंधांना केवळ याच कारणावरून चारित्र्य तपासण्याचा किंवा त्यावर प्रतिकूल मत बनवण्याचा आधार मानता येणार नाही. दोन संमतीधारक अविवाहित प्रौढांना त्यांच्या आवडीनुसार संबंध ठेवण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदा आपल्या देशात अस्तित्वात नाही.
सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या उमेदवाराचे अपील मंजूर करत, तेलंगणा उच्च न्यायालयाच्या एकल न्यायमूर्तींच्या त्या आदेशाला कायम ठेवले आहे, ज्यामध्ये या उमेदवाराच्या नियुक्तीवर पुन्हा विचार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. २०१४ मध्ये लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे उमेदवाराचे चारित्र्य ‘नैतिकदृष्ट्या पतित’ ठरवून तेलंगणा राज्य पोलीस भरती मंडळाने त्याची नियुक्ती रद्द केली होती. हे प्रकरण संबंधित उमेदवाराच्या शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबतच्या संबंधातून उद्भवले होते. पुढे २०१५ मध्ये दोन्ही बाजूंनी आपसांत तडजोड केल्यानंतर लोकअदालतीमध्ये हा खटला मिटवण्यात आला होता.
न्यायालयाचे निरीक्षण
या प्रकरणाचा संदर्भ देत न्यायालयाने सांगितले की, अपीलकर्ता आणि ती तरुणी शेजारी होते आणि सुमारे चार वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. प्रत्येक प्रेमसंबंधाचा शेवट लग्नातच होतो असे नाही. त्यामुळे केवळ ते नाते लग्नापर्यंत पोहोचले नाही, याचा अर्थ एका पक्षाने दुसऱ्या पक्षाची फसवणूक केली आहे, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, असे खंडपीठाने म्हटले.