वाराणसी : मूल जन्माला घालण्याने समाज कमी होत नाही किंवा वाढतही नाही. समाज आपली संस्कृती, सभ्यता आणि धर्मावर टिकून राहिल्याने दीर्घकाळ टिकतो आणि पुढे जातो, असे मत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी लोकसंख्येच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना केले.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी ‘आरएसएस’ प्रमुख मोहन भागवत यांच्या तीन मुले जन्माला घालण्यासंबंधीच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, संख्याबळाने कोणीही जिंकत नाही. कुत्र्यांची संख्या जास्त असते, पण जेव्हा एक सिंह गर्जना करतो तेव्हा सर्व पळून जातात.
अलीकडेच लखनौमध्ये मोहन भागवत म्हणाले होते की, जे लोक आता लग्न करत आहेत, त्यांना किमान तीन मुले जन्माला घालण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. विवाहाचा उद्देश सृष्टीला पुढे नेणे हा असावा, केवळ वासनापूर्ती नव्हे.
मुलाला इतके संस्कार द्या. इतके दृढ बनवा की तो कोणत्याही परिस्थितीत धर्माची पताका घेऊन पुढे जात राहील. १०० तारे तेवढा प्रकाश देत नाहीत, जेवढा एक चंद्र उगवताच अंधार दूर होतो. तुम्ही एक मूल करा किंवा चार, ही तुमची स्वतःची निवड आहे. यात कोणतेही बंधन नाही. देवकी आणि वासुदेवाने ८ अपत्ये जन्माला घातली, तेव्हाच देवाचा अवतार झाला. अशा परिस्थितीत कोणी किती मुले जन्माला घालावीत, हे पालकांवरच सोडून द्यावे, असे ते म्हणाले.
भगवान श्रीकृष्णाचे वंशज यादव यांना कोणत्याही बाहेरील शत्रूने मारले नव्हते, तर ते आपापसातील संघर्षामुळेच नष्ट झाले होते. जेव्हा संख्या खूप जास्त होते आणि शिस्त व एकता राहत नाही, तेव्हा समाज आतून कमकुवत होऊ शकतो. संख्या वाढल्यास अनेकदा लोक आपापसात भांडून मरतात. म्हणून संख्येबद्दल तेच लोक बोलतात, ज्यांना आपल्या सनातन धर्माच्या खोलीचे खरे ज्ञान नाही., असे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.
धर्मशास्त्रांची अवहेलना केली जातेय!
धर्मशास्त्रांची अवहेलना केली जात आहे. असे होऊ नये की आपण जास्त मुले जन्माला घालू आणि एक दिवस एखादी प्रभावी व्यक्ती येऊन आपल्या मुलांना समजावून धर्म परिवर्तन करून टाकेल. पीक आपण पिकवू आणि कापणी दुसरा कोणीतरी करेल, म्हणून केवळ संख्या वाढवून काम चालत नाही, असे अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.