नवी दिल्ली : घरबसल्या आता एलपीजी सिलिंडर मागवणे आणखी सोपे होणार आहे. स्विगी इन्स्टामार्ट आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी एलपीजी सिलिंडरच्या होम डिलिव्हरीसाठी भागीदारी केली आहे. या सेवेअंतर्गत ग्राहकांना एचपी गॅस कनेक्शन नसतानाही इन्स्टामार्टवरून सिलिंडर ऑर्डर करता येणार आहे. सध्या ही सेवा बंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली असून, लवकरच इतर शहरांमध्येही विस्तार केला जाणार आहे.
देशातील पहिली क्विक-कॉमर्स एलपीजी सेवा
क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे एलपीजी सिलिंडरची ऑन-डिमांड होम डिलिव्हरी सुरू करणारे स्विगी इन्स्टामार्ट हे देशातील पहिले व्यासपीठ ठरले आहे. या भागीदारीमुळे इन्स्टामार्टवर उपलब्ध उत्पादनांच्या यादीत आता एलपीजी सिलिंडरचाही समावेश झाला आहे.
५ आणि १० किलोचे सिलिंडर उपलब्ध
सुरुवातीच्या टप्प्यात ग्राहकांना ५ किलोचा धातूचा एलपीजी सिलिंडर आणि १० किलोचा HP Navya कंपोझिट एलपीजी सिलिंडर उपलब्ध होणार आहे. मात्र, नियमित वापरातील १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर सध्या या सेवेत उपलब्ध नसणार आहे.
एचपी गॅस कनेक्शनची गरज नाही
या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे आधीपासून एचपी गॅस कनेक्शन असणे आवश्यक नाही. त्यामुळे विद्यार्थी, नोकरीसाठी दुसऱ्या शहरात राहणारे नागरिक आणि लहान कुटुंबांनाही ही सुविधा सहज वापरता येणार आहे.
'अशी' करा ऑर्डर
स्विगी ॲपमधील Instamart विभाग उघडा.
HPCL LPG Cylinder किंवा HP Navya असा शोध घ्या.
५ किलो किंवा १० किलोचा सिलिंडर निवडून ऑर्डर करा.
पहिल्यांदा सिलिंडर खरेदी करताना डिलिव्हरीवेळी ओळखपत्र पडताळणी (ID Verification) करावी लागेल.
पुढील वेळी Refill पर्याय निवडून रिकामा सिलिंडर परत देत नवीन सिलिंडर मागवता येईल.
अधिकृत वितरकांकडूनच होणार डिलिव्हरी
सर्व ऑर्डर्स HPCLच्या अधिकृत वितरकांमार्फत पूर्ण केल्या जाणार आहेत. प्रशिक्षित कर्मचारी सर्व सुरक्षा नियमांचे पालन करून सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी करतील.
टप्प्याटप्प्याने होणार विस्तार
सध्या ही सेवा बंगळुरूमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर देशातील इतर शहरांमध्येही तिचा विस्तार केला जाणार आहे. २०२० मध्ये सुरू झालेले स्विगी इन्स्टामार्ट सध्या १३० हून अधिक शहरांमध्ये कार्यरत असून, ग्राहकांना ५० हजारांहून अधिक उत्पादने उपलब्ध करून देत आहे. HPCLसाठीही ही भागीदारी एलपीजी सिलिंडर अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे नवे माध्यम ठरणार आहे.