हैदराबाद : तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील शाबाद येथे अत्यंत धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीने पत्नी, दोन लहान मुलांसह लैंगिक छळाची तक्रार करणाऱ्या अल्पवयीन मुलगी, तिची आई आणि आजीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. या सहा हत्यांनंतर आरोपी फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत.
पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय राजकुमार याने शुक्रवारी रात्री शाबाद येथील आपल्या राहत्या घरी पत्नी पार्वती सरिता (वय ३०) आणि ४ व १ वर्षांच्या दोन मुलांवर प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या केली.
POCSO तक्रार करणाऱ्या अल्पवयीन मुलीचाही खून
घरातील हत्येनंतर आरोपी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी गेला. या मुलीने १६ मे रोजी त्याच्याविरोधात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्सेस (POCSO) Act अंतर्गत तक्रार दाखल केली होती. आरोपीने तिला कारमधून निर्जनस्थळी नेऊन हत्या केल्याचा आरोप आहे.
याचवेळी त्याने मुलीची ४५ वर्षीय आई आणि ६५ वर्षीय आजीचीही हत्या केली. मात्र, घरात उपस्थित असलेल्या मुलीच्या २० वर्षीय दिव्यांग बहिणीला कोणतीही इजा करण्यात आली नाही.
वडिलांना फोन करून दिली गुन्ह्यांची कबुली
हत्याकांडानंतर आरोपीने आपल्या वडिलांना फोन करून सर्वांची हत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याने मोबाईल बंद केला. आपण आत्महत्या करणार असल्याचेही त्याने सांगितल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी तरुण जोशी यांनी दिली. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.
आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके
पोलीस अधिकारी तरुण जोशी यांनी सांगितले की, आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
२०१८ मध्ये प्रेमविवाह
राजकुमार आणि पार्वती यांनी २०१८ मध्ये प्रेमविवाह केला होता. या दाम्पत्याला तीन अपत्ये होती. त्यापैकी पहिल्या मुलीचा बालपणी मृत्यू झाला होता.
मे महिन्यात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे आणि तिचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी राजकुमारविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटकही करण्यात आली होती. मात्र, संबंधित कलमांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने त्याने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला होता.
समुपदेशनासाठीही बोलावले होते
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीच्या वर्तनाबाबत यापूर्वीही तक्रारी होत्या. त्याला दोन ते तीन वेळा समुपदेशनासाठी बोलावण्यात आले होते. कुटुंबीयांनी त्याची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचे सांगितले होते. त्याला जुगाराचे व्यसनही होते आणि यापूर्वी त्याच्यावर कर्जही झाले होते.
मुलांची झोपेतच हत्या झाल्याचा संशय
घटनास्थळी पोहोचलेल्या नातेवाईकांनी मुलांची झोपेतच हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. पत्नी पार्वतीचा मृतदेह ज्या खोलीत आढळला, तेथे झटापटीची स्पष्ट चिन्हे दिसून आली. घराचे दरवाजे आतून बंद होते, तर पंखा, एसी आणि कूलर सुरू अवस्थेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
फॉरेन्सिक तपास सुरू
दोन्ही घटनास्थळांची फॉरेन्सिक पथकांकडून तपासणी करण्यात आली आहे. हत्याकांडामागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम उलगडण्यासाठी पोलीस तपास सुरू असून, आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.