नवी दिल्ली : महाराष्ट्र, ओदिशा आणि बिहारमधून घातपाताचा कट रचणाऱ्या चार कट्टरतावाद्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने अटक केली आहे. संशयित आरोपी संवेदनशील ठिकाणांची पाहणी करून आणि 'एनक्रिप्टेड ऑनलाइन प्लॅटफॉर्म' द्वारे इतरांची भरती करून दहशतवादी कारवाया करण्याचे नियोजन करत होते. या कारवाईदरम्यान 'एसआयटी' आणि पोलिसांनी एक 'आयईडी' आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. आरोपींपैकी दोन जण गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी खेळण्यातील कारमध्ये आयईडी बसवण्याच्या प्रक्रियेत होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
मोसैब अहमद, मोहम्मद हम्माद, मोहम्मद सोहेल आणि शेख इम्रान अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे चौघेही अतिरेकी विचारसरणीने प्रभावित झाले होते आणि 'गझवा-ए-हिंद'सारख्या विधानांचा प्रसार करत होते. ते सोशल मीडियावरील बंदी असलेल्या गटांमध्ये सक्रिय होते, जिथे जिहाद, अतिरेकी विचारसरणी आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित मजकूर शेअर केला जात असे. एका आरोपीने लाल किल्ल्याचा फोटो एडिट करून त्यावर काळा झेंडा लावला होता, जेणेकरून अनुयायांना कट्टरपंथी बनवता येईल आणि प्रतीकात्मक लक्ष्यांचा संकेत देता येईल, असेही पोलिसांनी नमूद केले.
राम मंदिर, संसद भवन निशाण्यावर
या प्रकरणातील एक संशयित शेख इम्रानने डिसेंबर २०२५ मध्ये दिल्लीला भेट देऊन लाल किल्ला आणि इंडिया गेटसह महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. या मॉड्यूलने अयोध्येतील राम मंदिर, संसद भवन आणि काही लष्करी तळांवर हल्ल्याच्या शक्यतेवरही चर्चा केली होती. आरोपी मोसैब अहमद हा ठाण्यातील एका खाजगी ऑटोमोबाईल वर्कशॉपमध्ये काम करत होता. त्याने यापूर्वी आखाती देशांमध्ये ऑटो इलेक्ट्रिशियन म्हणून काम केले असून तो आपल्या तांत्रिक कौशल्याचा वापर करून रिमोट-कंट्रोल कारमध्ये आयईडी डिझाइन करण्याचा प्रयत्न करत होता.
मोहम्मद हम्माद हा मुंबईचा रहिवासी असून तो पत्रव्यवहाराद्वारे १२ वीचे शिक्षण घेत आहे. त्याने आयईडी तयार करण्यासाठी बॉल बेअरिंग, खिळे आणि रिमोट-कंट्रोल कारचे फोटो शेअर केले होते. बिहारमधील कटिहार येथील रहिवासी असलेला मोहम्मद सोहेल हा प्लंबर असून त्याने शस्त्रास्त्रे आणि स्फोटके गोळा करण्यासाठी तरुर्णाना प्रवृत्त केले होते. त्याने जिहादच्या नावाखाली पैसे गोळा करण्यासाठी बँक खाते आणि क्यूआर कोडही शेअर केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचे साथीदार आणि हँडलर्सचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोन आणि डिजिटल उपकरणांचे विश्लेषण करण्यात येत आहे.