चेन्नई : तमिळनाडू विधानसभेच्या रिंगणात प्रथमच उतरून प्रस्थापित पक्षांना जोरदार धक्का देणारा टीव्हीके पक्ष आणि त्या पक्षाचे नेते व अभिनेते थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर शुक्रवारी मोकळा झाला. राजभवनात झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीनंतर, राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी अधिकृतपणे आमंत्रित केले आहे. ‘तमिळगा वेत्री कळघम’चे (टीव्हीके) नेते थलपती विजय शनिवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सत्तास्थापनेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) दिलेला पाठिंबा निर्णायक ठरला असून, राज्यात आता एका नवीन युतीचे समीकरण पाहायला मिळणार आहे.
माकपचे नेते के. बालकृष्णन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना या घडामोडींची पुष्टी केली. ते म्हणाले की, पाठिंब्याचे पत्र सादर केल्यानंतर राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. राजभवनातून बाहेर पडल्यानंतर विजय यांनी थेट माकपच्या मुख्यालयाला भेट देऊन डाव्या आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले. शुक्रवारी लोक भवनात विजय यांनी सलग तिसऱ्यांदा राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा आपला दावा ठामपणे मांडला. त्यांनी टीव्हीके, काँग्रेस, सीपीआय, सीपीआय(एम) आणि व्हीसीके या पक्षांच्या एकूण ११८ आमदारांची पाठिंब्याची पत्रे सादर केली. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेने २३४ पैकी १०८ जागा जिंकल्या होत्या. यापैकी दोन जागा विजय यांनी जिंकल्या. त्यांना एक जागा सोडावी लागेल. परिणामी, आमदारांची एकूण संख्या १०७ झाली आहे. काँग्रेसच्या पाच आणि सीपीआय, सीपीआय(एम) व व्हीसीकेच्या प्रत्येकी दोन आमदारांच्या पाठिंब्याने टीव्हीकेने बहुमत मिळवले आहे. यापूर्वी, विजयने ६ आणि ७ मे रोजी सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. मात्र, ११८ आमदारांच्या पाठिंब्याशिवाय त्याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करता येणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले होते.
टीव्हीके समर्थकांची निदर्शने
जर टीव्हीकेला बहुमत मिळवता आले नाही, तर डीएमके आणि एआयएडीएमके युती करून सरकार स्थापन करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. दोन्ही पक्षांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केल्यास आपले सर्व आमदार राजीनामा देतील, असे टीव्हीकेने म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी टीव्हीके समर्थकांनी राज्यपाल भवनासमोर (लोक भवन) निदर्शने केली आणि घोषणाबाजी केली. पोलिसांनी अनेक समर्थकांना ताब्यात घेतले.
काँग्रेससोबतची युती संपुष्टात
तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाने शुक्रवारी लोकसभेतील आपल्या खासदारांच्या बसण्याच्या व्यवस्थेत बदल करण्याची मागणी केली. काँग्रेससोबतची युती आता अधिकृतपणे संपुष्टात आल्याने, सभागृहात काँग्रेस सदस्यांच्या शेजारी बसणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका द्रमुकने घेतली आहे. द्रमुक नेत्या खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून बदलत्या राजकीय परिस्थितीचा हवाला देत नवीन आसनव्यवस्थेची विनंती केली आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत. मात्र, त्यानंतर काँग्रेसने सरकार स्थापनेसाठी टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या या पावलामुळे द्रमुकसोबतची त्यांची जुनी युती संपुष्टात आली आहे.
‘लोकशाहीसाठी पाठिंबा’
भाकपचे प्रदेश सचिव वीरपांडियन यांनी या युतीला ‘लोकशाही कर्तव्य’ म्हटले आहे. ते म्हणाले, टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यांना केवळ ६ आमदारांची गरज होती. लोकशाही आणि जनतेच्या हितासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भाकपने हा पाठिंबा ‘सशर्त’ असल्याचे नमूद केले असून, राज्यात स्थिर, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी शासन मिळावे ही आमची प्रमुख अट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.