संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी केंद्राने फेटाळली; लालूंनी केली नितीशकुमारांच्या राजीनाम्याची मागणी

बिहारला विशेष दर्जा अथवा विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अधिवेशनापूर्वी भेट घेऊन केली होती, मात्र २०१२ मध्ये आंतरमंत्रीय गटाने (आयएमजी) तयार केलेल्या अहवालाचा हवाला देत सोमवारी केंद्र सरकारने ही मागणी सपशेल फेटाळली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : बिहारला विशेष दर्जा अथवा विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अधिवेशनापूर्वी भेट घेऊन केली होती, मात्र २०१२ मध्ये आंतरमंत्रीय गटाने (आयएमजी) तयार केलेल्या अहवालाचा हवाला देत सोमवारी केंद्र सरकारने ही मागणी सपशेल फेटाळली आहे.

बिहारमधील भाजपच्या घटक पक्षांनी विशेष दर्जाची मागणी केली असली तरी केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिलेल्या एका लेखी उत्तरामध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय विकास परिषदेने (एनडीसी) यापूर्वी काही राज्यांना निकषांच्या आधारे विशेष दर्जा दिला होता. यापूर्वी ‘आयएमजी’ने बिहारबाबत विचार केला होता, मात्र आंतरमंत्रीय गटाने ‘एनडीसी’च्या निकषांनुसार बिहारला विशेष दर्जा देता येऊ शकत नाही, असा निष्कर्ष काढला आहे, असेही लेखी उत्तरात म्हटले आहे.संसदेच्या अधिवेशनाच्या पू्र्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत जेडीयूचे संजयकुमार झा यांनी विशेष दर्जाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लोकजनशक्ती पार्टी आणि राजदनेही पाठिंबा दिला होता. विशेष दर्जा देता येणे शक्य नसल्यास राज्याला विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, तेही मान्य होईल, असेही जेडीयूने यापूर्वी स्पष्ट केले होते.

लालूप्रसाद यांची नितीश कुमारांवर टीका

दरम्यान, बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारने फेटाळल्यानंतर राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नितीश कुमार यांनी सत्तेसाठी बिहारची आकांक्षा आणि जनतेच्या विश्वासाशी तडजोड केली असावी असे वाटते, असे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. बिहारला विशेष दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन नितीशकुमार यांनी दिले होते, मात्र केंद्राने ही मागणी सपशेल फेटाळली आहे. त्यामुळे नितीशकुमार यांनी राजीनामा द्यावा, असेही लालूप्रसाद यांनी म्हटले आहे.

धरण क्षेत्रात पावसाची संथगती; पाणीसाठा ९ टक्क्यांवर, मुंबईकरांना किंचित दिलासा

टीईटी पेपर फुटी प्रकरण : उत्तर प्रदेशातून तिघांना अटक; एकूण ७ जण ताब्यात

राज्यात १४ लाख ८० हजार भटके कुत्रे! मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती; सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे पालन गरजेचे

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी

आघाडीच्या फळीची आज पुन्हा अग्निपरीक्षा; भारताचा मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध दुसरा टी-२० सामना