राष्ट्रीय

अपोलो रुग्णालयात पैशांच्या बदल्यात किडनी विक्री रॅकेट ‘द टेलिग्राफ’चे वृत्त ; केंद्र सरकारचे चौकशीचे आदेश

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : भारतातील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाविरोधात ‘किडनीच्या बदल्यात पैसे’ असे रॅकेट सुरू असल्याचे वृत्त इंग्लंडच्या ‘द टेलिग्राफ’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. सरकारने हे आरोप गांभीर्याने घेत केंद्रीय आरोग्य खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय अवयव व ऊती प्रत्यारोपण संघटनेने (नोट्टो) या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

इंग्लंडचे वर्तमानपत्र ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तात म्हटले की, भारतात मानवी अवयवांचा व्यापार बेकायदेशीर आहे. तरीही देशात मानवी अवयव विक्री मोठा व्यवसाय बनला आहे. म्यानमारच्या गरीब लोकांना पैसे देऊन त्यांच्या किडन्या विक्रीचे काम सुरू आहे. एका ५८ वर्षीय महिलेला सप्टेंबर २०२२ मध्ये किडनीसाठी ८० लाख म्यानमारी क्यात (२.१७ लाख) पैसे दिले.

ही शस्त्रक्रिया दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात झाल्याचे एका रिसीटवरून उघड झाले. किडनी दान करणारी व्यक्ती रुग्ण महिलेला ओळखत नव्हती, असे ‘टेलिग्राफ’च्या वृत्तात म्हटले आहे.

‘नोट्टो’चे संचालक डॉ. अनिल कुमार यांनी दिल्ली सरकारचे प्रधान सचिव (आरोग्य) यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. मानवी अवयव व ऊती कायदा १९९४ चे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करावी. त्याचा अहवाल आठवड्यात सादर करावा, असे आदेश दिले.

इंग्लंडच्या ‘द टेलिग्राफ’ वृत्तानुसार, अपोलो रुग्णालय दिल्ली व डॉ. संदीप गुलेरिया हे किडनी रॅकेट चालवत असल्याचे म्हटले आहे. या किडनी रॅकेटसाठी म्यानमारच्या गरीब लोकांना पैशाचे आमिष दाखवले जाते.

सर्व कायदेशीर बाबींचे पालन : रुग्णालयाचा खुलासा

‘द टेलिग्राफ’मध्ये आलेले वृत्त फेटाळून लावताना इंद्रप्रस्थ वैद्यकीय महामंडळ लिमिटेडने म्हटले आहे की, मानवी अवयवांचे प्रत्यारोपण करताना प्रत्येक कायदेशीर व नैतिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाते. त्यात सरकारी मार्गदर्शक तत्त्वे पाळली जातात. कोणत्याही परदेशी व्यक्ती अवयवदात्याकडून अवयव घेताना संबंधित देशांच्या सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. तसेच अवयव घेताना देणारा व घेणारा यांची संमती लागते. तसेच आमच्या रुग्णालयाची स्वतंत्र प्रक्रिया आहे. आमच्याकडे परदेशातील प्रत्येक दात्याला त्यांच्या देशातील संबंधित आरोग्य खात्याचा सही व शिक्का असलेला फॉर्म २१ नोटरी करून भरावा लागतो. तसेच सरकारने नेमलेली अवयव प्रत्यारोपण प्राधिकृत समिती असते. ती रुग्णालयाच्या सर्व कागदपत्रांची छाननी करते. तसेच अवयवदाता व घेणारा यांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्याचबरोबर रुग्ण व दात्याच्या अनेक वैद्यकीय चाचण्या तसेच जनुकीय चाचण्या केल्या जातात. आमचे रुग्णालय उच्च नैतिकता पाळण्यास कटिबद्ध आहे. तसेच अतिउत्कृष्ट दर्जाची वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे, असे रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस