राष्ट्रीय

व्हीव्हीपॅट स्लीप आणि ईव्हीएममध्ये तफावत नाही; निवडणूक आयोगाचे मतमोजणीनंतर स्पष्टीकरण, १४४० व्हीव्हीपॅटमधील स्लिपची मोजणी पूर्ण

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘कुछ तो गडबड है’ असे म्हणत विरोधकांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘कुछ तो गडबड है’ असे म्हणत विरोधकांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यातच आता निवडणूक आयोगाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील स्लीप्सची संख्या यात कोणतीही तफावत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

“महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणीत सर्व २८८ मतदारसंघांमध्ये एकूण १४४० व्हीव्हीपॅटमधील स्लीप्सची अनिवार्य मोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्ण झाली असून ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लीप्सची संख्या यात कोणतीही तफावत आढळली नाही,” असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे.

“केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या क्रमांकामधून लॉटरी पद्धतीने निवडलेल्या ५ मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशिन्सच्या स्लीप्सची मोजणी बंधनकारक आहे. या प्रक्रियेला उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. ईव्हीएममधील प्रत्येक उमेदवाराच्या मतसंख्येशी व्हीव्हीपॅट स्लीप्सची संख्या पडताळणे हा या प्रक्रियेचा उद्देश आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळेस सर्व २८८ मतदारसंघांमध्ये एकूण १४४० व्हीव्हीपॅटमधील स्लीप्सची अनिवार्य मोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्ण करण्यात आली आहे.

मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ५ मतदान केंद्रांच्या क्रमांकाची सरमिसळ करून भारत निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांसमोर आणि उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान केंद्रे निवडण्यात आली. या प्रक्रियेनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमधील ५ मतदान केंद्रांतील मतमोजणीनंतर ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लीप्सची संख्या यामध्ये कुठेही तफावत आढळून आलेली नाही, असे अहवाल महाराष्ट्र राज्यातील सर्व म्हणजे ३६ जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले आहेत,” असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

ही प्रक्रिया प्रत्येक मतमोजणी केंद्रात उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोरच पार पडल्याने प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या दस्तऐवजांवरही या प्रतिनिधींच्या सह्या आहेत. व्हीव्हीपॅट स्लीप्सच्या मोजणीच्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी, प्रत्येक मतमोजणी केंद्रावर विशेष सुरक्षेची काळजी घेऊन स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला होता आणि या संपूर्ण प्रक्रियेचे सीसीटीव्ही कव्हरेज तसेच चित्रिकरण करण्यात येऊन ते जतन केले गेले आहे. मतमोजणीच्या संदर्भातील भारत निवडणूक आयोगाच्या विहित प्रक्रियेनुसार प्रत्येक मतदारसंघाच्या ५ मतदान केंद्रांसाठीची व्हीव्हीपॅट स्लीपची गणना अनिवार्य असून, ती पूर्ण झाल्याशिवाय मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत नाही, तसेच विजयी उमेदवार जाहीर करता येत नाही. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांमध्ये याबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले आहे, असेही निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल