राष्ट्रीय

यंदा जूनपर्यंत उन्हाळा भाजून काढणार;भारतीय हवामान खात्याचा इशारा

Swapnil S

नवी दिल्ली : यंदा उन्हाळा हा नेहमीपेक्षा अधिक तापदायक असणार आहे. एप्रिल ते जूनदरम्यान उन्हाळा भाजून काढणारा ठरणार आहे, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. नेहमी आठ दिवस असणाऱ्या उष्णतेच्या लाटा यंदा २० दिवसांच्या असतील. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, ओदिशा आणि आंध्र प्रदेशात उन्हाळ्याचा सर्वाधिक तडाखा असेल. एप्रिल ते जूनदरम्यान भारताच्या अनेक भागात तापमान नेहमीपेक्षा अधिक असेल. विशेषत: मैदानी भागात उष्णतेच्या लाटा होरपळून टाकणाऱ्या असतील. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, यंदा देशाच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटा येणार आहेत.

पश्चिम बंगाल, ओदिशा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश ही राज्ये सूर्याच्या आग ओकण्याने होरपळणार आहेत. सध्या देशात निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे आम्ही उष्णतेच्या लाटांबाबत सावधानता बाळगत आहोत. उष्णतेचा मुकाबला करायला आम्ही राज्य सरकारसोबत बैठकही घेतली आहे, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतात कोणत्याही मैदानी प्रदेशात जास्तीत जास्त तापमान ४० किंवा त्यापेक्षा अधिक, तर डोंगराळ भागात ३० अंशापेक्षा अधिक तापमान झाल्यास त्याला उष्णतेच्या लाटा समजले जाते. तर सामान्य तापमानापेक्षा ७ अंश किंवा त्याहून अधिक तापमान आढळल्यास त्यास गंभीर उष्माघात समजले जाते. भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा म्हणाले की, देशाच्या मध्य व पश्चिम भागात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. गुजरात, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, आंध्रात उष्णतेच्या लाटा येतील, असे त्यांनी सांगितले.

मुंबईत पुढील पाच दिवस उन्हाचा तडाखा

मुंबईत पुढील पाच दिवस कमाल तापमान ३५ तर किमान तापमान २४ ते २५ अंश राहणार आहे. पुढील चार दिवस मुंबईच्या तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होणार असून, या आठवड्यात तापमान ३५ अंशापर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होण्याची शक्यता आहे. राज्यातील सात जिल्ह्यांना तापमानवाढीमुळे ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. तर सोलापूर, नांदेड, लातूर व उस्मानाबाद येथे रात्रीचे वातावरण उष्ण राहील. अकोला, अमरावती, चंद्रपूर व यवतमाळ येथे उष्णतेच्या लाटा येतील.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त