त्रिशूर : केरळच्या मध्य त्रिशूर जिल्ह्यातील मुंदथिकोड येथील एका फटाका कारखान्यात मंगळवारी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत किमान १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
आगामी 'त्रिशूर पूरम' उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एका मंदिरासाठी फटाके तयार करण्याचे काम सुरू असताना दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडली. स्फोटाच्या वेळी कारखान्यात सुमारे ४० कामगार उपस्थित असल्याची शक्यता असून जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
'केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा' ने (केएसडीएमए) ८ जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. घटनास्थळावरून ५ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ३ जणांचे अवशेष सापडले आहेत. या स्फोटाचा आवाज अनेक किमी दूरपर्यंत ऐकू आला आणि परिसरातील घरांचेही नुकसान झाले आहे. भातशेतीमधील निर्जन भागात असलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये हे फटाके तयार केले जात होते. घटनास्थळी सातत्याने होत असलेल्या छोट्या स्फोटांमुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याचे वडाकांचेरी नगरपालिकेचे अध्यक्ष पी. एन. सुरेंद्रन यांनी सांगितले. अतिउष्णतेमुळे हा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य आणि महसूल विभाग बचावकार्यासाठी तैनात करण्यात आले असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्य आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी त्रिचूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्रिचूर जिल्हा रुग्णालयात जखमींच्या उपचारांसाठी विशेष सोय करण्याचे आदेश दिले आहेत.
दंडाधिकारी चौकशीचे आदेश
त्रिचूर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. या भीषण स्फोटाचे नेमके कारण आणि त्यानंतरच्या परिस्थितीचा सखोल तपास करण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस सध्या घटनास्थळी बचावकार्य राबवत आहेत.