कोलकाता : तृणमूल काँग्रेसमधील आमदारांपाठोपाठ आता खासदारांनीही बंड पुकारले आहे. सोमवारी पक्षाचे मुख्य प्रतोद काकोली घोष दस्तिदार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेतील तृणमूलच्या तब्बल २० खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून भाजपप्रणित 'एनडीए'ला पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत आलेल्या असतानाच पक्षाला आणखी एक हादरा बसला आहे.
बंडखोर खासदारांनी तूर्तास तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिलेला नाही किंवा ते भाजपमध्येही प्रवेश करणार नाहीत. संसदेत एक वेगळा गट म्हणून काम करत एनडीएला पाठिंबा देण्याची त्यांची रणनीती आहे, जेणेकरून पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून सुटका होऊ शकेल.
लोकसभेत सध्या तृणमूल काँग्रेसचे २८ खासदार आहेत. बशीरहाटचे खासदार हाजी नुरुल इस्लाम यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त आहे पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची गरज असते. २० खासदारांचा आकडा हा या निकषात अगदी चपखल बसत असल्याने बंडखोरांचे स्थान कायदेशीरदृष्ट्या मजबूत मानले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल विधानसभेत तृणमूलच्या ८० पैकी ५८ आमदारांनी पक्षादेश झुगारून ज्येष्ठ नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्याऐवजी पक्षातून हकालपट्टी झालेल्या ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली होती. हा धक्का ताजा असतानाच आता लोकसभेतही पक्षाला मोठे भगदाड पडले आहे.
मुख्य प्रतोदवरून वाद
काकोली घोष दस्तिदार म्हणाल्या की, माझ्या संमतीने पक्षाच्या जवळपास २० खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील जनतेचा कौल आम्ही स्वीकारला असून, आमचे राजकीय भविष्य एनडीएसोबत जोडलेले असावे, असा आमचा विश्वास आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काकोली घोष दस्तिदार या अजूनही लोकसभेत पक्षाच्या अधिकृत मुख्य प्रतोद असल्याचा दावा या बंडखोर गटाकडून केला जाणार आहे. तृणमूल नेतृत्वाने दस्तिदार यांच्या जागी कल्याण बॅनर्जी यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्याची अधिकृत माहिती लोकसभेच्या सचिवालयाला वेळेत देण्यात आली नव्हती, असा दावा एका बंडखोर खासदाराने केला आहे.
एका खासदाराचा राजीनामा
दरम्यान, टीएमसीचे राज्यसभा खासदार सुखेंदु शेखर रॉय यांनी सोमवारी पक्षाचा राजीनामा दिला असून, संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या (राज्यसभा) सदस्यत्वाचाही त्याग केला आहे. राज्यसभा सचिवालयाने त्यांचा राजीनामा तत्काळ मंजूरही केला आहे. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संसदेत पक्षाची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडणारे मुख्य चेहरे म्हणून सुखेंदु शेखर रॉय यांची ओळख आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यसभेच्या सभापतींकडे सुपूर्द केला असून, त्याच वेळी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाशी असलेले सर्व संबंध तोडत असल्याची घोषणाही केली.
टीएमसीची न्यायालयात धाव
पक्षातून बंडखोरी केलेल्या गटाचे नेते ऋतब्रत बॅनर्जी यांना विधानसभेचे 'विरोधी पक्षनेते' म्हणून मान्यता देण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयाला टीएमसीने न्यायालयात आव्हान दिले आहे. १८ व्या पश्चिम बंगाल विधानसभेचे पहिले अधिवेशन येत्या १८ जूनपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर टीएमसीच्या वकिलांनी या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. न्यायालयाने या याचिकेवर ११ जून रोजी यादीत अग्रस्थानी ठेवून सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.