ट्विटरने लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक काढून टाकली आहेत. गुरुवारी मध्यरात्रीपासून व्हेरिफाईड अकाऊंट्सवरून फ्री ब्ल्यू टिक्स काढून टाकण्यास सुरुवात असून या सेवेसाठी ज्यांनी पैसे दिलेले नाहीत, त्यांच्या अकाऊंटवरून ब्ल्यू टिक काढण्यात आले आहे. त्यामुळे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान, सलमान खान, विराट कोहली, महेंद्र सिंग धोनी, किंवा विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस-भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना मोठा धक्का बसला आहे.
एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर अनेक नवे नियम केले. यामधील एक महत्त्वाचा नियम म्हणजे, ब्ल्यू टिकसाठी पैसे मोजावे लागणार असल्याची घोषणा त्याने केली होती. ज्यांनी ट्विटरचे पेड सबस्क्रिप्शन घेतलेले नाही, त्यांच्या अकाऊंटवरून ब्ल्यू टिक काढणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी ट्विटर वापरकर्त्यांना २० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर अनेक दिग्गज कलाकार आणि नेत्यांच्या ट्विटरवरून ब्लु टिक गायब झाले.