नवी दिल्ली : देशभर गाजलेल्या ‘नीट-यूजी’ पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने गुरुवारी पाटणा येथून दोन जणांना अटक केली. या प्रकरणात सीबीआयने केलेली ही पहिलीच अटक आहे.
अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे मनीषकुमार आणि आशुतोषकुमार अशी असून त्यांनी उमेदवारांना परीक्षेपूर्वी सुरक्षित ठिकाणी नेले आणि तेथे त्यांना फुटलेले पेपर आणि त्यांची उत्तरे उपलब्ध करून दिली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दोघांना पाटणा येथील विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या दोघांची चौकशी करण्यासाठी रिमांड देण्याची विनंती न्यायालयास केली जाणार आहे.
आशुतोषकुमार याने पाटणा येथील ‘लर्न बॉइज हॉस्टेल ॲण्ड प्ले स्कूल’ भाडेतत्त्वावर घेतले होते. तेथून बिहारच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अर्धवट जळलेल्या अवस्थेतील प्रश्नपत्रिका जप्त केल्या. या संकुलाचा वापर उमेदवारांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी होऊ शकतो याची आशुतोषकुमार याला जाणीव होती, असे सीबीआयला आढळले.
नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने सहा एफआयआर नोंदविले आहेत. एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि अन्य संबंधित अभ्यासक्रमांसाठी सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ‘एनटीए’च्या वतीने ‘नीट-यूजी’ परीक्षा घेण्यात येते. यावर्षी ही परीक्षा ५ मे रोजी परदेशातील १४ शहरांसह ५७१ शहरांमधील ४,७५० केंद्रांमध्ये घेण्यात आली होती आणि त्या परीक्षेला २३ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.
सीबीआयने रविवारी पहिला एफआयआर नोंदविला होता. निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यापूर्वी सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे घोषित केले होते.
सुप्रीम कोर्टाची ‘एनटीए’ला नोटीस
‘नीट-यूजी २०२४’ परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना ज्या ‘ओएमआर शीट्स’ उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, त्याबद्दलच्या तक्रारी नोंदविण्यासाठी मुदत दिली होती का, याबाबतची माहिती सादर करावी असा आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने ‘एनटीए’ला दिला. खासगी शिकवणी केंद्र आणि ‘नीट’च्या काही विद्यार्थ्यांनी केलेल्या नव्या याचिकांवरून न्या. मनोज मिश्रा आणि न्या. एसव्हीएन भट्टी यांच्या सुट्टीकालीन पीठाने ‘एनटीए’ला नोटीस बजावली असून त्याची पुढील सुनावणी ८ जुलै रोजी घेण्याचे मुक्रर केले आहे. जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी काही जणांना ‘ओएमआर शीट्स’ मिळाल्या नाहीत, असा युक्तिवाद शिकवणी संस्था आणि काही विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला. तर संकेतस्थळावर ‘ओएमआर शीट्स’ अपलोड करण्यात आल्या होत्या आणि उमेदवारांनाही देण्यात आल्या होत्या, असे ‘एनटीए’च्या वतीने युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी सांगितले.