जम्मू-काश्मीर बस अपघात X
राष्ट्रीय

जम्मू-काश्मीर बस अपघात: उधमपूरमध्ये बस दरीत कोसळून १५ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये भीषण बस अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी आहेत. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Mayuri Gawade

जम्मू-काश्मीरमधील डोंगराळ रस्त्यांवरील प्रवास पुन्हा एकदा जीवघेणा ठरला आहे. उधमपूर जिल्ह्यात सोमवारी (दि. २०) सकाळी प्रवासी बस दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत किमान १५ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगर परिसरातील डोंगराळ रस्त्यावर सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ही बस दुर्गम भागातून उधमपूरकडे येत होती.

स्थानिकांनी सुरू केलं बचावकार्य

अपघातानंतर स्थानिक नागरिक सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. त्यानंतर पोलीस, जिल्हा प्रशासन, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि आरोग्य विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी हलवण्याची तयारी सुरू आहे.

नेत्यांकडून शोक व्यक्त, मदतीचे आश्वासन

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. “ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. मृतांच्या कुटुंबियांना धीर मिळावा आणि जखमी लवकर बरे व्हावेत,” अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली. तसेच प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ आणि आरोग्य विभागाला तातडीने सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही शोक व्यक्त करत, “या दुःखद प्रसंगी सरकार पीडित कुटुंबांसोबत ठामपणे उभे आहे,” असे सांगितले. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून डोंगराळ रस्त्यांवरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पृथ्वीकडे येतंय शक्तिशाली सौर वादळ; मुंबईकरांना दिसणार का दुर्मिळ 'ऑरोरा'?

'तात्काळ देश सोडा'; इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट, भारत सरकारकडून महत्त्वाच्या सूचना

फिलिपिन्समध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा हाय अलर्ट जारी, थरकाप उडवणारे Video व्हायरल

पोलिसाच्या मुलाला कॉपी करताना पकडलं; संतप्त वडिलांनी कॉलेजमध्ये घुसून शिक्षकांनाच कानफडलं, VIDEO व्हायरल

Mumbai : दादरमध्ये BEST बसचा भीषण अपघात; एकामागोमाग एक वाहनांना दिली धडक; एकाचा मृत्यू, Video