मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये घराबाहेर उभ्या असलेल्या १९ वर्षीय तरुणीला दोन तरुणांनी खेचत जबरदस्तीने कारमध्ये बसवल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अवघ्या २५ सेकंदांत घडलेल्या या प्रकारानंतर तरुणीच्या सुरक्षेसह कायदा-सुव्यवस्थेवरही अनेक प्रश्न उपस्थित झाले. मुलीचे अपहरण झाल्याच्या भीतीने कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनीही अपहरणाचा गुन्हा दाखल करून तरुणी आणि संबंधित तरुणांचा शोध सुरू केला. मात्र, काही तासांतच या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. संबंधित तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यात तिने आपले अपहरण झाले नसून आपण स्वतःच्या मर्जीने घरातून गेल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर, आपण लग्न केल्याचेही तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. ही घटना उज्जैनमधील लालबाई-फूलबाई परिसरात मंगळवारी रात्री घडली. तरुणीचे वडील पोलीस ठाण्याची क्रेन चालवतात.
२५ सेकंदांत नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ८ वाजता तरुणी घराबाहेर उभी होती. त्याचवेळी नंबर प्लेट नसलेली काळ्या रंगाची कार तिच्या घराजवळ आली. कारमधून आलेल्या दोन तरुणांनी तिला खेचत गाडीत बसवलं आणि तेथून निघून गेले. संपूर्ण प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हे फुटेज पाहिल्यानंतर कुटुंबीयांना तरुणीचे अपहरण झाल्याची भीती वाटली. तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
ध्रुव कुमावतचे नाव तपासात समोर
पोलीस निरीक्षक प्रतीक शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अज्ञात आरोपींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान उर्दूपुरा येथील ध्रुव कुमावतचे नाव समोर आले. त्याच्यासोबत आणखी एक तरुण असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
ध्रुवचा मोबाइल बंद असल्याने त्याचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरुणी आणि संबंधित तरुणांच्या शोधासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. एक पथक कार आणि तरुणांचा शोध घेत असून, दुसरे पथक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे.
अन् काही तासांत आला तरुणीचा VIDEO
अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत ध्रुवही दिसत आहे. “मी माझ्या मर्जीने गाडीत बसले होते,” असा दावा तरुणीने व्हिडिओमध्ये केला. आपण आणि ध्रुवने लग्न केल्याचा दावाही तिने केला असून, दोन-तीन दिवसांत स्वतःहून परत येणार असल्याचे दोघांनी म्हटले आहे. ध्रुवनेही व्हिडिओमध्ये आपण गेल्या चार वर्षांपासून तरुणीच्या संपर्कात असल्याचा दावा केला. दोघेही स्वेच्छेने घरातून निघाल्याचे सांगत कुटुंबीयांवर कोणताही दबाव आणू नये, असेही त्याने म्हटले.
अपहरण की स्वेच्छेने घर सोडलं? पोलीस तपास सुरू
एका बाजूला सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुणीला कारमध्ये खेचून बसवल्याचे दिसत असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे तरुणीने स्वतः व्हिडिओ पाठवत आपण स्वेच्छेने गेल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा नेमका घटनाक्रम काय होता, हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
सध्या पोलीस तरुणी, ध्रुव आणि त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि तरुणीने पाठवलेला व्हिडिओ या दोन्हींच्या आधारे पुढील तपास केला जात आहे.