लोकसभेच्या जागा ५०% वाढणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब, आता खरी परीक्षा संसदेत  
राष्ट्रीय

लोकसभेच्या जागा ५०% वाढणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब, आता खरी परीक्षा संसदेत

लोकसभेबरोबरच सर्व विधानासंभाच्या जागां ५० टक्क्यांनी वाढणार आहेत. तसेच महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्तावावर शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. आता पुढील रणनीती ठरवण्यासाठी उभय बाजूंनी जोरबैठका सुरु झाल्या आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभेबरोबरच सर्व विधानासंभाच्या जागां ५० टक्क्यांनी वाढणार आहेत. तसेच महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्तावावर शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. आता पुढील रणनीती ठरवण्यासाठी उभय बाजूंनी जोरबैठका सुरु झाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी १ वाजता सेवा तीर्थ येथे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लोकसभेतील प्रतिनिधित्वाच्या राज्यांच्या प्रमाणात कोणत्याही राज्याचे नुकसान होऊ नये, यासाठी काही दुरुस्त्यांसह नव्या विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. दक्षिणेकडील राज्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागा ५० टक्क्यांनी वाढवण्यास सरकारने सहमती दर्शवली आहे. तसेच २०५१पर्यंत जागांची संख्या स्थिर ठेवण्याचा प्रस्तावही आहे, असे सूत्रांनी सांगितले.

नव्या विधेयकानुसार, वाढीव जागांची पुनर्रचना २०११च्या जनगणनेच्या आधारे करण्यात येणार आहे. प्रत्येक राज्यातील जागांची संख्या न बदलता संसदीय मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रस्तावीत घटनादुरुस्तीमुळे पुनर्रचनेद्वारे लोकसभेची सध्याची ५४३ सदस्यसंख्या वाढवून कमाल ८५० करण्याचा प्रस्ताव आहे. सत्ताधारी पक्षाच्या मते, या निर्णयामुळे २०२९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा होईल.

याच विधेयकाला सरकारने एप्रिलमध्ये संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडले होते; मात्र लोकसभेत पुरेसे संख्याबळ न मिळाल्याने ते मंजूर होऊ शकले नव्हते. आता हे विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा सरकारने केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांत दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. डीएमके, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हे पक्ष विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने मात्र या विधेयकाला विरोध केला असून, शनिवारी रणनीती ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली आहे.

घटनादुरुस्ती विधेयकासाठी सरकारने चार दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. लोकसभेचे अधिवेशन ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी, तर राज्यसभेचे अधिवेशन २ आणि ३ डिसेंबर रोजी होणार आहे.‘सरकार जेव्हा अधिवेशन किंवा विशेष अधिवेशन बोलावते, तेव्हा देशासाठी अत्यंत महत्त्वाची विधेयके किंवा कामकाज असते,’ असे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

संविधान बदलणे हाच मोदी-शहांचा हेतू - काँग्रेस

महिला आरक्षणाच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना मतदारसंघ पुनर्रचना करायची आहे. मात्र, त्यांचा अंतिम उद्देश संविधान बदलण्याचा आहे, असा आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला. घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या संसदीय रणनीती गटाची बैठक सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीनंतर काँग्रेसने मोदी आणि शहा यांच्यावर आरोप केले.

इंडिया आघाडीची आज महत्त्वाची बैठक

संसदेच्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा मांडण्याची शक्यता असल्याने विरोधकांनी एकजुटीने रणनीती आखण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी सकाळी ११.३० वाजता त्यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या संसदीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीस इंडिया आघाडीतील पक्षांसह द्रमुक, आप आणि बिजेडीसारख्या आघाडीबाहेरील विरोधी पक्षांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : शासकीय जमिनीवरील गृहनिर्माण संस्थांना मालकी हक्क - मुख्यमंत्री

सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत भाजप प्रणित पॅनल विजयी

शरद पवार गटाच्या भूमिकेबद्दल उत्सुकता

अखेर मीरारोडच्या जमिनीचा सातबारा पंतप्रधानांच्या बालमित्राच्या नावावर; तब्बल १९ वर्षांचा संघर्ष यशस्वी

टाटा सन्सची सोमवारी बैठक; चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला कोर्टाची स्थगिती नाही