मुंबईवरील 26/11/2008 च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 21 जानेवारीला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वूर राणाची प्रत्यार्पण रोखण्यासाठी 'रिट याचिका' फेटाळून लावली. त्यानंतर आज शनिवारी राणाच्या भारत प्रत्यार्पणासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी मंजुरी दिली.
मुंबई 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकार 2020 पासून प्रयत्न करत होते. जो बायडेन सरकारने त्यासाठी 'ग्रीन सिग्नल' दिला होता. राणाने त्याचे प्रत्यार्पण रोखण्यासाठी फ्रान्सिस्कोमधील नवव्या सर्किटमधील यूएस कोर्ट ऑफ अपीलसह कनिष्ठ न्यायालयांमध्ये त्यांच्या प्रत्यार्पणासाठी अपील केले होते. मात्र, प्रत्येक वेळी त्याची याचिका फेटाळण्यात आली. ऑगस्टमध्ये, नवव्या सर्किटने भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार राणाचे प्रत्यार्पण करण्यास परवानगी असल्याचा निर्णय दिला होता.
प्रत्यार्पण रोखण्यासाठी राणाचा प्रयत्न अयशस्वी
टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, तहव्वूर राणाने प्रत्यार्पण रोखण्यासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात 'रिट याचिका' दाखल केली होती. 16 डिसेंबर 2024 रोजी, अमेरिकन सॉलिसिटर जनरल एलिझाबेथ बी प्रीलॉगर यांनी न्यायालयाला राणाची याचिका फेटाळण्याची विनंती करणारा प्रतिसाद दाखल केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी 21 जानेवारीला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर आज शनिवारी (दि.25) राणाच्या भारत प्रत्यार्पणासाठी मंजुरी दिली. त्यामुळे आता राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच त्याला भारतात आणले जाईल.
राणावरील आरोप आणि प्रत्यार्पणासाठीचा घटनाक्रम
तहव्वूर राणा यावर 26/11/2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड असलेला डेव्हिड हेडली याला मदत केल्याचा आरोप आहे. हेडली हा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी आहे. 2008 मध्ये 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन लोकांसह 166 लोकांचा मृत्यू झाला आणि मुंबईतील अनेक ठिकाणी 60 तासांची घेराबंदी करण्यात आली. त्याच्यावर भारताविरुद्ध दहशतवादी कृत्य करणे, खून करणे असे विविध गुन्ह्यांचा कट रचण्याचा आरोप आहे.
दैनिक जागरणच्या माहितीनुसार, राणा याला 2009 मध्ये युनायटेड स्टेट्सची देशांतर्गत कायदा अंमलबजावणी संस्था फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (The Federal Bureau of Investigation - FBI) ने अटक केली होती. तेव्हापासून तो अमेरिकेच्या तुरुंगात आहे. त्याच्यावर इलिनॉयच्या उत्तरी जिल्ह्यासाठी युनायटेड स्टेट्स जिल्हा न्यायालयात खटला चालवण्यात आला होता. दुसऱ्या आरोपपत्रात त्याच्यावर तीन आरोप लावण्यात आले. न्यायाधीशांनी त्याला डेन्मार्कमध्ये दहशतवादाला भौतिक पाठिंबा देण्याचा कट आणि लष्कर-ए-तोयबाला भौतिक मदत पुरवणे या दोन आरोपांमध्ये दोषी ठरवले.
एएनआयच्या माहितीनुसार, 7 जानेवारी 2013 रोजी, इलिनॉयच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट कोर्टाने राणाला 168 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तेव्हापासून तो अमेरिकेतील तुरुंगात आहे.
राणाला भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारकडून 2020 पासून प्रयत्न सुरु होते. कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट जिथे राणा त्याची शिक्षा भोगत होता येथील एका मॅजिस्ट्रेट न्यायाधीशाने त्याला भारतात आरोपांना सामोरे जाण्यासाठी प्रत्यार्पण करण्याच्या उद्देशाने तात्पुरत्या अटक वॉरंटवर 10 जून 2020 रोजी स्वाक्षरी केली.
राणाने प्रत्यार्पणाला विरोध केला परंतु 16 मे 2023 रोजी प्रत्यार्पण मॅजिस्ट्रेट न्यायाधीशांनी राणाचा युक्तिवाद फेटाळून लावला आणि तो प्रत्यार्पण योग्य असल्याचे प्रमाणित केले. त्यानंतर राणाने कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टसाठी युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट कोर्टात हेबियस कॉर्पसच्या रिटसाठी अर्ज केला. 15 ऑगस्ट 2024 रोजी,नवव्या सर्किट कोर्टाने हेबियस कोर्टाच्या निर्णयाची पुष्टी केली. न्यायालयाने राणाची याचिका फेटाळली.
त्यानंतर शेवटचा प्रयत्न म्हणून राणाने आपले प्रत्यार्पण रोखण्यासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात 'रिट याचिका' दाखल केली होती. 16 डिसेंबर 2024 रोजी, अमेरिकन सॉलिसिटर जनरल एलिझाबेथ बी प्रीलॉगर यांनी न्यायालयाला राणाची याचिका फेटाळण्याची विनंती करणारा प्रतिसाद अर्ज दाखल केला. राणाची याचिका 21 जानेवारीला न्यायालयाने फेटाळली आणि आज शनिवारी (25 जानेवारी) राणाच्या भारत प्रत्यार्पणासाठी मंजुरी दिली.
कोण आहे तहव्वूर राणा
दैनिक जागरणच्या माहितीनुसार, तहव्वूर राणाचा जन्म पाकिस्तानात झाला होता. त्याने 10 वर्ष पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम पाहिले. त्यानंतर कॅनडात जाऊन त्याने तेथील नागरिकत्व स्वीकारले. तेव्हापासून त्याची मूळ पाकिस्तानी कॅनडियन नागरिक म्हणून त्याची ओळख होती. कॅनडात स्थायिक झाल्यानंतर त्याने भारत विरोधात दहशतवादी हल्ल्याचे कट रचायला सुरुवात केली. जर्मनी, इंग्लंड, कॅनडासह त्याने अनेक देशात प्रवास केला आहे. दहशतवादी डेव्हिड हेडली आणि लष्कर सोबत मिळून त्याने मुंबई हल्ल्याचा कट रचला होता. तो 26/11 च्या हल्ल्याचा मास्टर माईंड हेडली याचा जवळचा मित्र आहे.
26/11/2008 चा मुंबई हल्ला
मुंबईतील लिओपोल्ड कॅफे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताजमहाल हॉटेल पॅलेस, ओबेरॉय ट्रायडंट, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि सेंट झेवियर्स कॉलेज येथे 26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला.
या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता तर 300 जण जखमी झाले होते. मृतांमध्ये काही अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे.
दैनिक भास्करच्या माहितीनुसार, मुंबई हल्ल्याच्या 405 पानांच्या आरोपपत्रात आरोपी म्हणून राणाच्या नावाचाही उल्लेख आहे. त्यानुसार राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाचा सदस्य आहे. आरोपपत्रानुसार राणा हल्ल्याचा मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याला मदत करत होता.
हल्ल्यात AK-47, IED, RDX आणि ग्रेनेडचा वापर करण्यात आला. बॉम्बस्फोट, सामूहिक गोळीबार करण्यात आला आणि लोकांना ओलीस ठेवण्यात आले.
या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब हा पकडला गेला होता. 2012 मध्ये कसाबला फाशी देण्यात आली.
राणा-हेडलीने मुंबई हल्ल्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली होती, मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, राणा भारतात आल्यानंतर हल्ल्याचे ठिकाण आणि राहण्याची ठिकाणे सांगून दहशतवाद्यांना मदत करत होता. राणानेच ब्ल्यू प्रिंट तयार केली होती, ज्याच्या आधारे हा हल्ला करण्यात आला होता.
राणा आणि हेडलीने दहशतवादी कट रचला होता. मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणाची मोठी भूमिका होती, असे आरोपपत्रात म्हटले आहे.