(प्रातिनिधिक छायाचित्र) 
राष्ट्रीय

धक्कादायक! ३०० रुपयांचे 'दागिने' तब्बल ६ कोटींना विकले, जयपूरच्या ज्वेलर बाप-लेकाने अमेरिकन महिलेला फसवले

खरे दागिने असल्याचे समजून महिला अमेरिकेत परत गेली. तथापि, एप्रिलमध्ये तेथील एका प्रदर्शनात दागिने प्रदर्शित केले असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर...

Swapnil S

राजस्थानच्या जयपूरमधील एका सोन्याच्या दुकान मालकाने अमेरिकन महिलेला अवघ्या ३०० रुपयांचे बनावट सोन्याचे दागिने तब्बल ६ कोटी रुपयांना विकून फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने भारतात परतून प्रकरणाची चौकशी करण्याचा दोनदा अयशस्वी प्रयत्नही केला. अखेर, आता अमेरिकन दूतावासाच्या हस्तक्षेपानंतर जयपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

माहितीनुसार, राजेंद्र सोनी आणि त्यांचा मुलगा गौरव सोनी अशी आरोपींची नावं असून जयपूरच्या जोहरी बाजारात त्यांचं दुकान आहे. अमेरिकन महिला चेरिश हिने त्यांच्या दुकानातून ६ कोटी रुपयांचे दागिने खरेदी केले. खरंतर, सोनी पिता-पुत्रांनी सोन्याची निव्वळ पॉलीश केलेले अवघ्या ३०० रुपयांचे नकली दागिने चेरिशला विकले होते. पण, याबाबत चेरिशला काहीही कल्पना नव्हती. ते दागिने घेऊन ती अमेरिकेत गेली. तथापि, एप्रिलमध्ये तेथील एका प्रदर्शनात दागिने प्रदर्शित केले असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर चेरिश थेट भारतात परत आली.

आरोपींकडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न

जयपूरमध्ये आल्यावर तिने सोनी पिता-पुत्रांचे सोन्याचे दुकान गाठून बनावट दागिने विकल्याबद्दल विचारणा केली. मात्र, राजेंद्र सोनी आणि गौरव सोनी दोघांनीही तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आणि आरोप फेटाळले. त्यानंतर चेरिशने माणक चौक पोलिस ठाण्यात दुकानमालकांविरुद्ध एफआयआर दाखल केला. याचा बदला म्हणून आरोपींनीही तिच्यावर खोटा गुन्हा दाखल केला.

फरार आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक तयार

या घडामोडींमुळे त्रस्त झालेल्या चेरिशने अखेरीस अमेरिकन दुतासावासाकडे मदत मागितली आणि त्यांच्या हस्तक्षेपामुळे जयपूर पोलिसांनी तपास सुरू केला आणि दागिने खरोखरच बनावट असल्याचे आढळून आले. दुकान मालक आणि त्याचा मुलगा दोघेही फरार असून त्यांना पकडण्यासाठी जयपूर पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. तर, दागिन्यांसाठी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या नंदकिशोर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Mumbai : २३,००० पाणथळ जागांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण; कायदेशीर संरक्षणाचा मार्ग मोकळा

Pune : रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमानाची यशस्वी निर्मिती; ‘प्रोजेक्ट गरुडा’ची इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Melodi Team पुन्हा चर्चेत; पंतप्रधान मोदींच्या खास Melody गिफ्टने जिंकली नेटकऱ्यांची मनं, Video व्हायरल

Mumbai : सेव्हन हिल्स रुग्णालयावर खासगी संस्थेचे वर्चस्व; ६० वर्षांचा करार, सुधार समितीत पडसाद उमटणार

Mumbai : डिसेंबरपर्यंत ग्रीन बाँड बाजारात; मोठ्या प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी तसेच उत्पन्नवाढीसाठी BMC चा निर्णय