मंदिराबाहेरून पळवलेल्या दीड वर्षांच्या चिमुरड्याची पोलिसांकडून सुटका; चकमकीत दोन्ही आरोपी जखमी 
राष्ट्रीय

Uttar Pradesh : मंदिराबाहेरून पळवलेल्या दीड वर्षांच्या चिमुरड्याची पोलिसांकडून सुटका; चकमकीत दोन्ही आरोपी जखमी

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये मंदिराबाहेरून अपहरण करण्यात आलेल्या दीड वर्षांच्या चिमुरड्याची पोलिसांनी थरारक चकमकीनंतर सुखरूप सुटका केली. IPS अंशिका वर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिल्लीत मुलाला विकण्यासाठी घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करत मोठी कारवाई केली.

Mayuri Gawade

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात मंदिर परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या दीड वर्षांच्या चिमुरड्याची पोलिसांनी थरारक कारवाई करत सुखरूप सुटका केली. या कारवाईदरम्यान पोलिस आणि आरोपींमध्ये झालेल्या चकमकीत दोन आरोपी जखमी झाले असून एका पोलीस कर्मचाऱ्यालाही गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना बरेलीमधील आंवला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनौना धाम मंदिर परिसरात घडली होती. २४ मे रोजी रमन नावाच्या व्यक्तीचा दीड वर्षांचा मुलगा मंदिराबाहेर भावंडांसोबत खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत अपहरणाची तक्रार दाखल केली होती.

आयपीएस अंशिका वर्मा यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी एसओजी, सर्व्हिलान्स आणि स्थानिक पोलिसांची पाच विशेष पथके तयार केली. या संपूर्ण तपासाचे नेतृत्व पोलीस अधीक्षक अंशिका वर्मा यांनी केले.

सीसीटीव्ही फुटेज, सर्व्हिलान्स आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांची ओळख पटवली. योगेश कन्नौजिया (२८) आणि पवन सिंह (२५) अशी आरोपींची नावे असून, दोघेही शाहजहानपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

दिल्लीत मुलाला विकण्याचा होता कट

तपासादरम्यान आरोपी मुलाला दिल्लीत विकण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मंगळवारी रात्री फुलासी तिराहा परिसरात पोलिसांनी सापळा रचला.

दुचाकीवरून मुलाला घेऊन जाणाऱ्या आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाठलागादरम्यान आरोपींची दुचाकी घसरली आणि त्यांनी चिमुरड्याला रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात फेकून दिलं.

पोलिसांवर गोळीबार, प्रत्युत्तरात आरोपी जखमी

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी त्यानंतर थेट पोलिसांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल कौमिश कुमार जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात योगेश आणि पवन यांच्या पायाला गोळ्या लागल्या.

उपनिरीक्षक सोमपाल यांनी जीवाची पर्वा न करता झुडपात पडलेल्या चिमुरड्याला सुरक्षित बाहेर काढलं. ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर IPS अंशिका वर्मा घटनास्थळी पोहोचल्या. चिमुरड्याला सुरक्षित पाहून त्या भावुक झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर मुलाला सुखरूप कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलं.

शस्त्रांसह दुचाकी जप्त

पोलिसांनी आरोपींकडून दोन देशी पिस्तुलं, जिवंत काडतुसे, रिकामे खोके आणि अपहरणासाठी वापरण्यात आलेली दुचाकी जप्त केली आहे. दरम्यान, जखमी आरोपी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

Mumbai : कल्याण-इगतपुरी मार्गावर १३ तासांचा मेगाब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

भायखळा केबल पुलाचे काम अंतिम टप्प्यात; दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फुटणार

मुंबईकरांची AC लोकलला पसंती; अवघ्या ४ महिन्यात दीड कोटी प्रवाशांचा प्रवास

बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या घाऊक बदल्या; कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

फुफ्फुसात अडकलेला एलईडी बल्ब काढत ९ महिन्यांच्या बाळाचे वाचवले प्राण ; पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूटमधील डॉक्टरांची कामगिरी