PTI
राष्ट्रीय

चेंगराचेंगरीत १२२ ठार; उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील भीषण दुर्घटना

उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील पुलराई गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘सत्संग’ या धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२२ जण ठार झाले असून अनेक लोक जखमी झाले आहेत.

Swapnil S

हाथरस (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील पुलराई गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘सत्संग’ या धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२२ जण ठार झाले असून अनेक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. या सत्संगसाठी मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाले असताना ही दुर्घटना घडली.

सत्संग आयोजित करण्यात आला होता, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमल्याने चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अथवा बेशुद्धावस्थेत असलेल्यांना सिकंदर राव ट्रॉमा सेंटरमध्ये ट्रक आणि अन्य वाहनांमधून आणण्यात आले. मृतदेह आरोग्य केंद्राच्या बाहेरच ठेवण्यात आले होते. इटाह येथील रुग्णालयात २७ मृतदेह आणण्यात आले असून त्यामध्ये २३ महिला, तीन लहान मुले आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

समाज माध्यमावर एक व्हिडीओ फित व्हायरल झाली, त्यामध्ये ट्रकमध्ये बसलेली एक महिला पाच-सहा मृतदेहांशेजारी बसून रडत असताना दिसत आहे. तर अन्य वाहनामध्ये एका पुरुषाचा आणि महिलेचा मृतदेह दिसत आहे. सत्संग संपल्यानंतर तेथून बाहेर पडताना गर्दीमुळे धक्काबुक्की झाली आणि लोक एकमेकांच्या अंगावर कोसळले, असे ही घटना पाहणाऱ्या एका महिलेने सांगितले.

आग्रा येथील अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अलिगडचे विभागीय आयुक्त या घटनेची चौकशी करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी रवाना होऊन मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जखमींवर तातडीने उपचार केले जातील, यावर जातीने लक्ष ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींना दु:ख, सानुग्रह अनुदान घोषित

हाथरसमधील दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची, तर जखमींना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले.

चपला, बूट व मृतदेहांचा सर्वत्र खच

घटनास्थळी चपला व बुटांचा खच पडला होता, चेंगराचेंगरीत पायदळी तुडवले गेल्याने अनेकांचा मृत्यू झाला. घटनास्थळाला एखाद्या युद्धभूमीसारखे स्वरूप आले होते. सर्वत्र मृतदेहांचा खच पडला होता. त्यातच काही जिवंत असलेले जखमी विव्हळत असल्याचे भीषण चित्र दिसून येत होते.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक