पोलीस चेकिंग चकवायला बाईक सुसाट पळवली; बायको पडली, तरी पठ्ठ्याने धूम ठोकली, Video व्हायरल X | व्हिडिओवरून घेतलेले स्क्रीनशॉट
राष्ट्रीय

पोलीस चेकिंग चकवायला बाईक सुसाट पळवली; बायको पडली, तरी पठ्ठ्याने धूम ठोकली, Video व्हायरल

उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे पोलीस चेकिंग टाळण्यासाठी पतीने अचानक बाईक वळवली. त्यामुळे पत्नी रस्त्यावर पडली, तरी पती लहान मुलाला घेऊन पुढे निघून गेला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Mayuri Gawade

उत्तराखंड : पोलीस चेकिंग सुरू असल्याचं पाहून अनेक वाहनचालकांची तारांबळ उडते. पण उत्तराखंडमध्ये एका पठ्ठ्याने पोलिसांपासून वाचण्यासाठी असं काही केलं की त्याची पत्नीच रस्त्यावर पडली. विशेष म्हणजे पत्नी खाली पडल्याचं पाहूनही त्याने बाईक थांबवली नाही. उलट तो तसाच पुढे निघून गेला. हा अजब प्रकार उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे घडला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने या घटनेत महिलेला दुखापत झालेली नाही.

पोलिसांना पाहताच बाईक पळवली अन्...

माहितीनुसार, उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील रुद्रपूर येथील त्रिशूल चौकात पोलीस वाहनांची तपासणी करत होते. नंबर प्लेट नसलेल्या आणि हेल्मेट न घालता वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ही तपासणी सुरू होती.

याच वेळी एक व्यक्ती बाईकवरून तिथे आला. त्याच्या मागे पत्नी आणि एक लहान मुलगा बसल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, थांबण्याऐवजी त्याने अचानक बाईक वळवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मागे बसलेल्या पत्नीचा तोल गेला आणि ती रस्त्यावर पडली.

पत्नी पडली, पण पती थांबलाच नाही!

या घटनेतील सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे पत्नी रस्त्यावर पडूनही पतीने बाईक थांबवली नाही. पत्नीला लागलं का, ती व्यवस्थित आहे का, हे पाहण्यासाठीही तो मागे फिरला नाही. तो मुलासह बाईकवरून पुढे निघून जातो.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने महिलेकडे धाव घेतली. त्यांनी तिला रस्त्यावरून उठवलं आणि मदत केली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहा

महिलेला दुखापत झाली का?

रुद्रपूरचे पोलीस क्षेत्राधिकारी विभव सैनी यांनी या घटनेबाबत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्रिशूल चौकात वाहनांची तपासणी सुरू असताना एका बाईकस्वाराने पोलिसांपासून वाचण्यासाठी वेगाने बाईक पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मागे बसलेली महिला रस्त्यावर पडली. पोलिसांनी महिलेची विचारपूस केली असता, तिने आपल्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचं सांगितलं. त्यानंतर तिचं समुपदेशन करून तिला घरी पाठवण्यात आलं.

पोलिसांनी वाहनचालकांना दिला इशारा

या घटनेनंतर पोलिसांनी वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. तपासणी टाळण्यासाठी अचानक बाईक वळवणं किंवा भरधाव वेगाने वाहन पळवणं धोकादायक ठरू शकतं, असं विभव सैनी यांनी सांगितलं. अशा निष्काळजीपणामुळे वाहनचालकासोबतच मागे बसलेल्या व्यक्तीचा आणि रस्त्यावरील इतर नागरिकांचाही जीव धोक्यात येऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

(संबंधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

गुजरातमध्ये सैराट, २३ सेकंदांत १३ वार! प्रेमविवाहाच्या ७ वर्षांनंतर भावाने बहिणीचं पुसलं कुंकू

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू