Varanasi : 'ऑर्डर, ऑर्डर!' म्हणत न्यायाधीशांच्या खुर्चीत जाऊन बसली महिला; 'आज मीच न्यायाधीश', कोर्टात तासभर गोंधळ 
राष्ट्रीय

Varanasi : 'ऑर्डर, ऑर्डर! आज मीच न्यायाधीश' म्हणत न्यायाधीशांच्या खुर्चीत बसली महिला; कोर्टात तासभर गोंधळ, Video व्हायरल

वाराणसी जिल्हा न्यायालयात एका महिलेने थेट न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसून स्वतःला जिल्हा न्यायाधीश घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. "ऑर्डर, ऑर्डर" म्हणत तिने सुनावणी घेण्याचाही प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Mayuri Gawade

वाराणसी जिल्हा न्यायालयात शुक्रवारी (दि.१२) एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला. मध्यमवयीन महिलेने थेट न्यायाधीशांच्या खुर्चीवर जाऊन बसत स्वतःला जिल्हा न्यायाधीश घोषित केल्याने न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून न्यायालयातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

'आज मीच जिल्हा न्यायाधीश'

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास संबंधित महिला न्यायालयात पोहोचली. सुरुवातीला तिने न्यायालयीन कर्मचाऱ्यांकडे न्यायाधीश कधी येणार याची चौकशी केली. त्यानंतर ती थेट न्यायाधीशांच्या आसनाजवळ गेली आणि खुर्चीवर बसली. इतकेच नाही, तर न्यायालयीन कामकाज सुरू असल्याप्रमाणे ती वागू लागली.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, न्यायाधीशांच्या खुर्चीत बसल्यानंतर महिलेने न्यायालयातील हातोडा (गॅव्हल) उचलून टेबलावर आपटला. त्यानंतर "ऑर्डर, ऑर्डर! आज मीच जिल्हा न्यायाधीश आहे. साक्षीदार आणि पुरावे माझ्यासमोर सादर करा," असे म्हणत ती सुनावणी घेत असल्यासारखी वागू लागली.

न्यायालयीन फायलीही चाळल्या

महिलेने न्यायाधीशांच्या टेबलावर असलेल्या काही प्रकरणांच्या फायलीही चाळल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे न्यायालयात उपस्थित कर्मचारी, वकील आणि नागरिक काही काळ गोंधळून गेले.

न्यायालयीन कर्मचारी आणि वकिलांनी महिलेला खुर्चीवरून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने उठण्यास नकार दिला. तिच्याशी बोलण्यासाठी येणाऱ्यांवर ती मोठ्याने ओरडत असल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकारामुळे जवळपास एक तास न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून न्यायालयातील काही भाग रिकामा करण्यात आला.

पोलिसांनी ताब्यात घेतले

घटनेची माहिती मिळताच कँट पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि महिला पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेला न्यायालयातून बाहेर काढून चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या वर्तनावरून तिला मानसिक आरोग्याशी संबंधित काही समस्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीनंतर तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

ही घटना घडली तेव्हा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यजुवेंद्र विक्रम सिंह रजेवर होते. मात्र संबंधित महिला न्यायालयातील प्रतिबंधित भागात कशी पोहोचली आणि तिला कोणी अडवले नाही, याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणामुळे न्यायालयातील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून ड्युटीवरील कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. काही स्थानिक वकिलांनी या महिलेने यापूर्वीही अशाच प्रकारे न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. या दाव्यांचीही चौकशी केली जाणार आहे.

IAF AN-32 Aircraft Crash : जोरहाट विमान दुर्घटनेत ५ जवानांचा मृत्यू; सहवैमानिक जखमी, हवाई दलाकडून चौकशीचे आदेश

सोशल मीडियावर मॅगीची चर्चा; अळ्या आढळल्याचा आरोप फेटाळत नेस्ले इंडियाचे स्पष्टीकरण, FSSAI कडून चौकशी सुरू

Vasai : संतापजनक! फुटबॉलमध्ये करिअरचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाला अटक

संरक्षण क्षेत्रात भारताचा नवा विक्रम; शत्रूची मिसाइल्स हवेतच उद्ध्वस्त होणार, DRDO च्या सलग ३ चाचण्या यशस्वी, राजनाथ सिंह यांची माहिती

IAF AN-32 Aircraft Crash : लँडिंगदरम्यान अनर्थ! जोरहाटमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले, VIDEO समोर