पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण; विक्रम-१ अंतराळात, 'ऐतिहासिक क्षण' - पंतप्रधान मोदी  (Photo-X)
राष्ट्रीय

पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण; विक्रम-१ अंतराळात, 'ऐतिहासिक क्षण' - पंतप्रधान मोदी

भारताने अंतराळ क्षेत्रात आज एक नवा इतिहास रचला. देशातील पहिल्या पूर्णपणे स्वदेशी आणि खासगी उपग्रह प्रक्षेपक (ऑर्बिटल रॉकेट) असणाऱ्या 'विक्रम-१ टेस्ट फ्लाइट-१'चे शनिवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

Swapnil S

श्रीहरिकोटा: भारताने अंतराळ क्षेत्रात आज एक नवा इतिहास रचला. देशातील पहिल्या पूर्णपणे स्वदेशी आणि खासगी उपग्रह प्रक्षेपक (ऑर्बिटल रॉकेट) असणाऱ्या 'विक्रम-१ टेस्ट फ्लाइट-१'चे शनिवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या मोहिमेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तलिखित पत्रासह अनेक तांत्रिक प्रात्यक्षिक पेलोड्स (उपग्रह व उपकरणे) पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (लो अर्थ ऑर्बिट) यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आले आहेत. मोदी यांनी या यशाचे वर्णन भारताच्या अंतराळ प्रवासातील एक "ऐतिहासिक आणि महत्त्वाचा क्षण" असे केले आहे.

'मिशन आगमन' असे नाव असलेल्या या मोहिमेमुळे भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राचे व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणाच्या जागतिक बाजारपेठेत अधिकृतपणे पदार्पण झाले आहे. हैद्राबादस्थित 'स्कायरूट एरोस्पेस' या स्टार्ट-अप कंपनीने हे रॉकेट विकसित केले असून, ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

चार टप्पे असलेले आणि सात मजली इमारतीइतकी उंची असलेले 'विक्रम-१' रॉकेट शनिवारी दुपारी १२.०५ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या पहिल्या लाँच पॅडवरून ढगाळ आकाशात झेपावले. हे रॉकेट पृथ्वीपासून ४५० किलोमीटर उंचीवर असलेल्या कक्षेत पोहोचले. तेथे ग्रहा स्पेस, कॉस्मोजर्व्ह, डीक्यूब्ड आणि स्कायरूटचे स्वतःचे 'स्कोप' हे तांत्रिक प्रात्यक्षिक पेलोड्स एकापाठोपाठ एक यशस्वीरित्या तैनात करण्यात आले.

या ऐतिहासिक रॉकेटमधून नरेंद्र मोदी यांनी स्वतः हाताने लिहिलेले आणि 'वंदे मातरम' असा संदेश असलेले एक पोस्टकार्डही अंतराळात पाठवले आहे. याशिवाय इस्रोचे शास्त्रज्ञ, अभियंता आणि भारतीय अंतराळवीरांचे पोस्टकार्ड, एक सूक्ष्म कलाकृती आणि १८ कॅरेट सोन्याचे छोटे रॉकेटही अवकाशात धाडण्यात आले. या सूक्ष्म कलाकृतीमध्ये भारताच्या अंतराळ क्षेत्राचे जनक विक्रम साराभाई, महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपी. जे. अब्दुल कलाम यांच्या सूक्ष्म मूर्तीचा समावेश आहे.

या यशस्वी उड्डाणाद्वारे स्कायरूट एरोस्पेसने २०२२ मधील आपल्या 'विक्रम-एस' या सबऑर्बिटल (उप-कक्षीय) मोहिमेच्या पुढे जात पूर्ण व्यावसायिक ऑर्बिटल क्षमता सिद्ध केली आहे. या रॉकेटचे संपूर्ण शरीर 'कार्बन कंपोझिट' संरचनेचे असून यात ३डी-प्रिंटेड इंजिनचा वापर करण्यात आला होता. प्रत्यक्ष उड्डाणात या आधुनिक तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वी ठरली असून, कंपनीचा दावा आहे की असे तंत्रज्ञान वापरणारे हे जगातील पहिलेच रॉकट आहे.

भारत तिसरा देश : स्कायरूटचे सह-संस्थापक नागा भरत डाका यांनी सांगितले की, अमेरिकेत आणि चीननंतर खासगी क्षेत्राद्वारे उपग्रह प्रक्षेपण करण्याची क्षमता साध्य करणारा भारत हा जगातील केवळ तिसरा देश ठरला आहे.

स्टार्टअप्सचे यश : इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन म्हणाले, २०२० मध्ये अंतराळ क्षेत्रातील सुधारणांची घोषणा करण्यात आली होती. आज अवघ्या ६ वर्षांच्या आत, एका स्टार्टअप कंपनीने पहिल्याच प्रयत्नात उपग्रहाला कक्षेत यशस्वीरीत्या प्रस्थापित केले आहे. हा अत्यंत समाधानाचा क्षण आहे. जेव्हा या सुधारणा जाहीर झाल्या, तेव्हा देशात फक्त एक स्टार्टअप कंपनी होती. आज अंतराळ क्षेत्रात ४०० हून अधिक स्टार्टअप कंपन्या काम करत आहेत.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ऑनलाइन डिलिव्हरी घेताना तुमचे अधिकार काय? घराची सुरक्षितता राखण्यासाठी 'या' गोष्टी जाणून घ्या

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव पोर्शे कार डिव्हायडरवर धडकली; भीषण अपघातात गाडीचा पुढील भाग चक्काचूर

विवस्त्र होऊन मंदिरात गेली, देवीची मूर्ती घेऊन तलावात उडी; सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या मृत्यूमागचं गूढ काय?

Mumbai : एसी लोकलखालून धूर अन् ठिणग्या; घाटकोपर स्थानकात नेमकं काय घडलं? Video

मुंबईच्या धरणांचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर