गेल्या काही दिवसापासून संपूर्ण जगाचं लक्ष हे भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम 'चांद्रयान-3' या मोहीमेवर लागलं आहे . ही मोहीम अत्यंत यशस्वीरित्या पार पडली आहे. पुढील सात दिवसांत ही मोहीम संपणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे सुस्थितीत असल्याचं इस्रोने सांगितलं आहे.
'चांद्रयान-3' मोहिमेची तीन सर्वात मोठी उद्दिष्टे होती. यातील पहिलं उद्दिष्ट म्हणजे - चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणं हे होते. इस्रोने हे उद्दिष्ट यशस्वीपणे पार पाडलं. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरलं, अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या यान उतरवणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. या मोहिमेचं दुसरं उद्दिष्ट म्हणजे, प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर यशस्वीपणे डिप्लॉय करणं हे होतं. हे देखील इस्रोने यशस्वीपणे पार पाडलं आहे . प्रज्ञान रोव्हर हे सध्या चंद्रावर फिरत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर असणाऱ्या खड्ड्यामधून ते यशस्वीपणे वाट काढत आहे. या मोहिमेचं तिसरं उद्दिष्ट होतं, चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग करुन संशोधन करणं. हे उद्दिष्ट देखील काही प्रमाणात पार पडलं असून, प्रज्ञान रोव्हर आणखी संशोधन करत आहे. मात्र, यासाठी आता प्रज्ञानकडे केवळ सात दिवसांचा कालावधी बाकी आहे.
चांद्रयान-3 मोहिमेचा कालावधी हा केवळ 14 दिवसांचा असणार आहे असं इस्रोने याआधीच स्पष्ट केलं होतं. 23 तारखेला चांद्रयान-3 चं सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर ही वेळ सुरू होणार होती. यानंतर आता सात दिवस पूर्ण झाले असून आता केवळ सात दिवसांचा अवधी शिल्लक आहे. हा कालावधी आणखी एका दिवसाने वाढू शकतो, मात्र यासाठी लँडर आणि रोव्हरमध्ये पुरेशी पॉवर शिल्लक असणं फार गरजेचं आहे. चांद्रयान-3 ने जाऊन आतापर्यंत चंद्रावर महत्त्वाचे शोध लावले आहेत. विक्रम लँडरवर असणाऱ्या ChaSTE पेलो़डने चंद्राच्या मातीच्या तापमानाचा खोल वर जाऊन अभ्यास केला आहे. पृष्ठभागावर असणारं तापमान आणि थोड्या खोलीवरील तापमान यात भरपूर तफावत असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या प्रज्ञान रोव्हर हायड्रोजनचा शोध घेत आहे. चंद्रावर पाण्याच्या अस्तित्वासाठी हा शोध महत्त्वाचा ठरणार आहे.