राष्ट्रीय

विशाखापट्टणममध्ये नरसिंह स्वामी मंदिराची भिंत कोसळली; ८ भाविकांचा मृत्यू, PM मोदींकडून मदतीची घोषणा

दरवर्षी ३० एप्रिलला साजरा होणारा ‘चंदनोत्सवम’ हा एकमेव दिवस असतो जेव्हा श्री वराह लक्ष्मी नृसिंह स्वामींचा चेहरा भाविकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी खुला केला जातो. उर्वरित वर्षभर ते चंदन लावलेल्या स्वरूपातच दर्शनास उपलब्ध असतात. त्यामुळे भाविकांची गर्दी होती. भाविक ३०० रुपयांच्या तिकिटांसाठी रांगेत उभे असतानाच भिंत कोसळली.

Krantee V. Kale

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील श्री वराह लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिरात बुधवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली. मंदिर परिसरातील नव्याने बांधलेली २० फूट लांब भिंत चंदनोत्सवादरम्यान कोसळली. या दुर्घटनेत ८ भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

दरवर्षी ३० एप्रिलला साजरा होणारा ‘चंदनोत्सवम’ हा एकमेव दिवस असतो जेव्हा श्री वराह लक्ष्मी नृसिंह स्वामींचा चेहरा भाविकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी खुला केला जातो. उर्वरित वर्षभर ते चंदन लावलेल्या स्वरूपातच दर्शनास उपलब्ध असतात. त्यामुळे भाविकांची गर्दी होती. भाविक ३०० रुपयांच्या तिकिटांसाठी रांगेत उभे असतानाच भिंत कोसळली. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, ही भिंत फक्त २० दिवसांपूर्वी बांधण्यात आली होती. घटनेनंतर NDRF आणि SDRF यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढून किंग जॉर्ज रुग्णालयात (KGH) दाखल करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींकडून २ लाखांची मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांसाठी रु. २ लाखांची आर्थिक मदत आणि जखमींसाठी रु. ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. त्यांनी जखमींच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी सदिच्छाही व्यक्त केल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली?

या दुर्घटनेमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र एंडोमेंट विभागाचे प्रधान सचिव विनय चान यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, "रात्री २.३० ते ३.३० दरम्यान मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे होते. त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी या परिसरात अचानक शिरल्याने भिंत कोसळली असावी. भिंतीभोवती मातीचा भराव होता. वाऱ्यामुळे पांडाल कोसळले आणि त्यामुळे माती सैल झाली असण्याची शक्यता आहे."

भिंतीच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेवरुन टीका

YSRCP प्रवक्ते कोंडा राजीव यांनी या दुर्घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना सरकारवर टीका केली. "आज श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सवमच्या दिवशी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. भिंत कोसळल्यामुळे निरपराध भाविकांचा जीव गेला. या घटनेला जबाबदार कोण? स्थानिक नागरिक आणि भाविकांनी यापूर्वीच या भिंतीच्या बांधकामाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले होते, पण सरकारकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही", असा आरोप त्यांनी केला. तसेच, सरकारकडे जखमींवर अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्याची मागणीही केली.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video