राष्ट्रीय

मुर्शिदाबादमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक; केंद्रीय दले तैनात करण्याचे HC चे आदेश, प. बंगालमध्ये ३ ठार, १५ पोलिस जखमी, ११८ जणांना अटक

वक्फ सुधारणा विधेयकावरून पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात शुक्रवारपासून हिंसक घटना घडत असून त्यात वडील, मुलासह तीन जण ठार झाले आहेत. तसेच, १५ पोलीस जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

Swapnil S

कोलकाता : वक्फ सुधारणा विधेयकावरून पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात शुक्रवारपासून हिंसक घटना घडत असून त्यात वडील, मुलासह तीन जण ठार झाले आहेत. तसेच, १५ पोलीस जखमी झाल्याचेही वृत्त आहे. याप्रकरणी ११८ जणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कोलकाता उच्च न्यायालयाने मुर्शिदाबादमध्ये केंद्रीय दले तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कोणत्याही स्थितीत राज्यात वक्फ सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने नमूद केले की, 'हिंसाचाराचे आरोप समोर येतात, तेव्हा न्यायालय डोळेझाक करू शकत नाही.' वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधात मुर्शिदाबाद मध्ये पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय दल तैनात करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अधिकारी यांनी केली होती. याचिकवेर सुनावणी करताना 'केंद्रीय दलांनी राज्यांशी समन्वय साधून काम करावे, असे कोलकाता उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

समाजकंटकांकडून हत्या

जाफराबादमधील समशेरगंज परिसरात वडील आणि मुलाची घरातच धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली आहे. सदर दोघेजण घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. काही समाजकंटक घरात घुसले आणि त्यांनी पसार होण्यापूर्वी दोघांची हत्या केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

वक्फची अंमलबजावणी करणार नाही - ममता

वक्फ कायदा केंद्र सरकारने केला आहे. त्यामुळे त्याचे तुम्हाला हवे असलेले उत्तर केंद्र सरकारकडूनच घ्यावे. याबाबत राज्य सरकारने आपली बाजू स्पष्ट केली आहे. या कायद्याला आमचा पाठिंबा नाही. या कायद्याची राज्यात अंमलबजावणी करू दिली जाणार नाही. राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केली असतानाही हिंसाचार कशासाठी, असा सवालही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. धुलियान आणि समशेरगंज येथे हिंसाचाराचा उद्रेक झाला त्या पार्श्वभूमीवर ममतांनी हा सवाल केला.

११८ जणांना अटक

वक्फवरून पश्चिम बंगालमध्ये विशेषतः मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यात शनिवारी हिंसाचाराचा उद्रेक झाला, मात्र कोणत्याही स्थितीत राज्यात वक्फ सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुर्शिदाबाद जिल्ह्यात शुक्रवारपासून हिंसक घटना घडत असून आतापर्यंत या प्रकरणी ११८ जणांना अटक करण्यात आली आहे.

शांततेचे आवाहन

ममता बॅनर्जी यांनी शनिवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त भागात जाऊन शांततेचे आवाहन केले. यानंतर एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगाल राज्यातील सर्वधर्माच्या लोकांना माझे प्रामाणिक आवाहन आहे की, कृपया शांत राहा, संयम ठेवा. धर्माच्या नावाखाली कोणत्याही बेकायदेशीर वर्तनात सहभागी होऊ नका. प्रत्येक मानवी जीवन मौल्यवान आहे. राजकारणासाठी दंगली भडकावू नका, दंगली भडकवणारे समाजाचे नुकसान करत आहेत.

शनिवारी झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकात एक इसम गोळी लागून जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. स्थानिक पोलिसांनी गोळीबार केलेला नाही, कदाचित बीएसएफकडून गोळीबार झाला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. समाजातील काही घटकांकडून अफवा पसरविल्या जात असल्याने शनिवारी पुन्हा हिंसाचार घडला, अशा प्रकारच्या चिथावणीखोर वक्तव्यांना बळी पडू नका, हे समाजकंटकांचे काम आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

एनआयए चौकशीची मागणी

दरम्यान, विरोधी पक्षनेते सुवेन्दू अधिकारी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून रेल्वेच्या मालमत्तेची जी नासधूस करण्यात आली त्याची चौकशी एनआयएमार्फत करावी, अशी मागणी केली आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री