सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका धक्कादायक व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे. धावत्या रेल्वेत एका महिलेनं "आपल्याकडे एकटक का पाहताय?" असा जाब विचारताच तिच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला असून प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
व्हिडिओनुसार, काही तरुणी रेल्वे डब्यात प्रवास करत असताना एका पुरुष प्रवाशाच्या वागणुकीमुळे अस्वस्थ झाल्या. संबंधित व्यक्ती सुमारे अडीच तासांपासून त्यांच्याकडे एकटक पाहत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
वादातून मारहाण
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तरुणींनी त्या व्यक्तीचा व्हिडिओ रेकॉर्ड करत त्याला जाब विचारला."अडीच तासांपासून का पाहताय?" असा प्रश्न विचारत त्याच्या वागणुकीवर आक्षेप घेतला.
यानंतर परिस्थिती अचानक बिघडली. आरोपी वरच्या सीटवरून खाली उतरला आणि वाद वाढताच त्याने व्हिडिओ शूट करणाऱ्या महिलेच्या थोबाडीत मारली. या घटनेनंतर महिला घाबरलेल्या अवस्थेत "तुम्ही हात कसा लावला?" असा सवाल करताना ऐकू येते.
सोशल मीडियावर संताप
हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी रेल्वे प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना टॅग करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली.
काही वापरकर्त्यांनी घटनेदरम्यान इतर प्रवासी उपस्थित असूनही कोणी हस्तक्षेप न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. "लोक बघत राहिले, पण कोणी मदत केली नाही," अशी टीका करण्यात आली.
महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेनंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून आरपीएफ, हेल्पलाइन आणि तक्रार प्रणाली उपलब्ध असली तरी अशा घटनांमध्ये प्रवाशांनीही सतर्क राहणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
प्रवाशांनी अशा प्रसंगी रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती देणे, हेल्पलाइनचा वापर करणे किंवा अधिकृत माध्यमांद्वारे तक्रार नोंदवणे गरजेचे असल्याचेही सांगितले जात आहे.