(संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

महिलाशक्तीच तृणमूलचा विनाश करील - पंतप्रधानांचा घणाघात; TMC नेही केला पलटवार

पश्चिम बंगालच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एका जाहीर सभेत राज्यातील सत्तारूढ तृणमूल काँग्रेसवर चौफेर घणाघाती टीका केली.

Swapnil S

बारासत (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एका जाहीर सभेत राज्यातील सत्तारूढ तृणमूल काँग्रेसवर चौफेर घणाघाती टीका केली. संदेशखळी प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटतील आणि लोकसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विनाश करण्यात महिलाशक्ती महत्त्वाची कामगिरी बजावेल. संदेशखळी येथे महिलांसोबत जे प्रकार घडले ती अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

बारासत या उत्तर २४ परगणाच्या मुख्यालयातील एका जाहीर सभेत मोदी बोलत होते. संदेशखळी येथे तृणमूलचा नेता शाहजहान याने महिलांवर केलेले लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावण्याचे प्रकार यामुळे या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलेच तप्त झाले आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यापेक्षा तृणमूल सरकार लांगूलचालनालाच प्राधान्य देत असल्याची टीका मोदी यांनी केली.

तृणमूल काँग्रेसचे नेते गरीब, दलित आणि आदिवासी कुटुंबांमधील भगिनी आणि लेकींवर विविध ठिकाणी अत्याचार करीत आहेत. संदेशखळी येथील प्रकरणाचे पडसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात उमटतील आणि लोकसभेच्या निवडणुकीत महिला शक्ती तृणमूल काँग्रेसला हद्दपार करील. पश्चिम बंगालमधील महिला सक्षमीकरणाचे ऐतिहासिक महत्त्व आहे, मात्र तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत राज्यात महिलांवर अत्याचार होत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

पश्चिम बंगालची भूमी ही महिला शक्तीसाठी प्रेरणेचा स्रोत होती, मात्र तृणमूलच्या राजवटीत आता त्याच भूमीत महिलांवर अत्याचार होत आहेत. संदेशखळीमध्ये जे घडले त्याने कोणाचीही मान शरमेने खाली जाईल, परंतु तृणमूल सरकारला महिलांच्या वेदनांशी काहीही देणेघेणे नाही. तृणमूल सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करून मोदी म्हणाले की, संदेशखळीतील प्रकारांना जे जबाबदार आहेत त्यांच्या अटकेला अधिकारी प्रतिबंध करीत आहेत.

तृणमूल काँग्रेस हा राज्याच्या विकासातील मुख्य अडथळा आहे, बंगालला तृणमूल काँग्रेसचे ग्रहण लागले आहे, त्यामुळे इंडिया आघाडीला नाकारून मतदारांनी भाजपला साथ द्यावी, असे आ‌वाहनही मोदी यांनी केले.

ईडी अधिकाऱ्यांवर हल्ले, सीबीआयकडून आणखी दोन एफआयआरची नोंद

नवी दिल्ली : संदेशखळी येथे छापे टाकण्यासाठी गेलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर ५ जानेवारी रोजी जमावाने केलेल्या हल्ल्याप्रकरणी सीबीआयने बुधवारी आणखी दोन एफआयआर दाखल केले. त्यामुळे एकूण एफआयआरची संख्या आता तीन झाली आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने, ईडी अधिकाऱ्यांवर जमावाकडून झालेला हल्ला, तृणमूलचा निलंबित नेता शहाजहान याच्या रक्षकाने ईडी अधिकाऱ्यांवर केलेले आरोप आणि ईडी अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याची नाझत पोलीस ठाण्याने स्वत:हून नोंदविलेली तक्रार, या प्रकरणांचा तपास सुरू केला आहे.

पीडित महिलांनी मांडल्या मोदी यांच्यासमोर व्यथा

बारासत (पश्चिम बंगाल) : संदेशखळीतील महिलांच्या एका गटाने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने येथे अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. बारासत येथील एका जाहीर सभेनंतर मोदी यांनी महिलांच्या या गटाची भेट घेतली.

मोदी भेटीच्या वेळी या महिलांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथे तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख आणि त्याच्या साथीदारांनी महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावण्याच्या प्रकारांमुळे येथील वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले होते.

महिला शक्तीवरून तृणमूलचा मोदी यांच्यावर पलटवार

कोलकाता : महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांवर करण्यात आला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही, असा पलटवार तृणमूल काँग्रेसने बुधवारी केला. मोदी यांची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोपही तृणमूलने केला आहे.

देशात प्रत्येक तासाला महिलांविरुद्धच्या ५१ गुन्ह्यांची नोंद होत असते, या स्थितीत सुधारणा होण्यासाठी मोदी यांनी काय केले, असा सवाल तृणमूलचे नेते आणि राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर लोकसभेत भाजपच्या केवळ १३ टक्केच महिला का आहेत आणि जाहीर करण्यात आलेल्या १९५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत केवळ १४ च महिला का आहेत, असे सवालही ओब्रायन यांनी केले आहेत.

महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांच्यावर आहे, त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. तर बिल्कीस बानोवर अत्याचार करणाऱ्या आरोपींचा भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सत्कार केला, याकडे तृणमूलच्या राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी लक्ष वेधले आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी