पृथ्वीभोवतीचे नैसर्गिक संरक्षक कवच २०६६ पर्यंत पूर्णपणे पूर्ववत? जागतिक ओझोन दिनानिमित्त जागतिक हवामान संघटनेच्या अहवाल प्रसिद्ध 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

पृथ्वीभोवतीचे नैसर्गिक संरक्षक कवच २०६६ पर्यंत पूर्णपणे पूर्ववत? जागतिक ओझोन दिनानिमित्त जागतिक हवामान संघटनेच्या अहवाल प्रसिद्ध

जागतिक स्तरावर क्लोरोफ्लुरोकार्बन (सीएफसी) आणि ओझोन थराला हानी पोहोचविणाऱ्या अन्य घातक वायूंच्या उत्सर्जनावर लादण्यात आलेल्या कठोर निर्बंधांचे सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत.

Swapnil S

पुणे : जागतिक स्तरावर क्लोरोफ्लुरोकार्बन (सीएफसी) आणि ओझोन थराला हानी पोहोचविणाऱ्या अन्य घातक वायूंच्या उत्सर्जनावर लादण्यात आलेल्या कठोर निर्बंधांचे सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. अंटार्क्टिका खंडावरील ओझोन थराचे छिद्र गेल्या काही दशकांत लक्षणीयरीत्या लहान झाले असून, येत्या २०६६ पर्यंत पृथ्वीभोवतीचे हे नैसर्गिक संरक्षक कवच मोठ्या प्रमाणात पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

जागतिक ओझोन दिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) अहवालात मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या यशावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सन २००० पासून ओझोन थराच्या पुनर्प्राप्तीची प्रक्रिया सुरू असून, हा जागतिक पर्यावरण संवर्धनातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

हवामान संघटनेच्या ओझोन बुलेटिननुसार, २०२४ आणि २०२५ या सलग दोन वर्षांत अंटार्क्टिकावरील ओझोन छिद्राचा विस्तार आणि खोली १९९० ते २०१० या कालावधीतील सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या कमी नोंदविण्यात आली. २०२४ मधील ओझोन छिद्र हे १९९२ नंतरचे सातवे सर्वांत लहान छिद्र ठरले, तर २०२५ मधील छिद्र चौथे किंवा पाचवे सर्वांत लहान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. २०२४ मध्ये या छिद्राचे सरासरी क्षेत्रफळ सुमारे २० दशलक्ष चौरस किलोमीटर होते. २८ सप्टेंबर रोजी ते कमाल २२.४ दशलक्ष चौरस किलोमीटरपर्यंत पोहोचले होते. सीएफसी वायूंच्या उत्सर्जनात झालेली मोठी घट आणि अंटार्क्टिकाच्या उत्तरेकडून वाऱ्यांसोबत वाहून येणारी ओझोनयुक्त हवा, या दोन प्रमुख घटकांमुळे ही सुधारणा झाल्याचे हवामानशास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.

सीएफसी वायू वातावरणातील स्थितांबरात (स्ट्रॅटोस्फिअर) पोहोचल्यानंतर सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्यांचे विघटन होते आणि क्लोरीनचे अणू मुक्त होतात. हे मुक्त क्लोरीन अणू ओझोनच्या रेणूंशी रासायनिक अभिक्रिया करून त्यांचे ऑक्सिजनमध्ये रूपांतर करतात. परिणामी ओझोन थर पातळ होत जातो. मात्र, मॉन्ट्रियल प्रोटोकॉलद्वारे

सीएफसीसह ओझोन थराला हानी पोहोचविणाऱ्या पदार्थांच्या उत्पादनावर आणि वापरावर जागतिक स्तरावर निर्बंध आणण्यात आल्याने या विघातक प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.

जागतिक हवामान संघटनेच्या सरचिटणीस सेलेस्टे साउलो यांनी या घडामोडीचे स्वागत करताना, ओझोन थराची पुनर्प्राप्ती ही पर्यावरण क्षेत्रातील यशाची मोठी कथा असल्याचे म्हटले आहे. सन २००० पासून ओझोन थर सातत्याने पूर्ववत होत असून, येत्या काही दशकांत तो मोठ्या प्रमाणात पुनर्स्थापित होईल, असे त्यांनी नमूद केले.

सीएफसी वायूंमुळे ओझोन थराची मोठी हानी

ओझोन थर सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांपासून सजीवसृष्टीचे संरक्षण करतो. १९७०च्या दशकात अंटार्क्टिकावर ओझोन थराची मोठ्या प्रमाणात झीज होत असल्याचे वैज्ञानिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या प्रक्रियेचा सखोल अभ्यास सुरू झाला. रेफ्रिजरेटर, अग्निशामक उपकरणे, फोम आणि इतर उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएफसी वायूंमुळे ओझोन थराची मोठी हानी झाली.

सध्याची सुधारणा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक

या प्रक्रियेवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी WMOचे 'ग्लोबल ॲटमॉस्फियर वॉच' नेटवर्क जमिनीवरून उच्च दर्जाची निरीक्षणे नोंदवत आहे. पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनीही घातक वायूंच्या उत्सर्जनावर नियंत्रण आणल्याचा सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसत असल्याचे सांगितले. ओझोन थराची झालेली झीज पूर्णपणे भरून निघण्यासाठी आणखी काही दशके लागणार असली, तरी सध्याची सुधारणा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI वरील शुल्काचा भार व्यापाऱ्यांवर नको; दिल्लीतील व्यापाऱ्यांना धास्ती, पुन्हा रोखीकडे वळण्याचा निर्णय

१५ वर्षे पूर्ण झालेली मुस्लिम मुलगा-मुलगी लग्नासाठी सक्षम; पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा वादग्रस्त निर्णय

शाहझाद भट्टी टोळी दहशतवादी संघटना घोषित; गृह मंत्रालयाकडून UAPA कायद्यांतर्गत बंदी, देशभरातून २०० जणांना अटक

तृतीयपंथीयांना घर नाकारले तर कारवाई; राज्य सरकारचा इशारा

Mumbai : दोन हजार कोटी खर्चुन हॉटेल, पार्किंग हब, शॉपिंग मॉल; मानखुर्द जकात नाक्यावर ३० मजली इमारत