राष्ट्रीय

तिरुपती देवस्थान जगात सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर; सोने ११,३२९ किलो आणि तब्बल...

तिरुपतीचे भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिर देशविदेशात प्रसिद्ध आहे. त्यावर भक्तांचा गाढ विश्वास आहे.

Swapnil S

चेन्नई : दक्षिण भारतातील तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्ट जगभरातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर आहे. या ट्रस्टकडे ११,३२९ किलो सोने आणि १८,८१७ कोटींच्या बँक ठेवी इतकी संपत्ती जमा झाली आहे. गेल्या वर्षभरात तिरुपती देवस्थानकडे ११६१ कोटी रुपयांच्या बँक ठेवी जमा झाल्या आहेत. गेल्या १२ वर्षांतील हा उच्चांक आहे. यापूर्वीचा उच्चांक २०१५-१६ मध्ये (११५३.२६ कोटी रुपये) होता.

गेल्या अनेक वर्षांत या देवस्थानकडे किमान ५०० कोटी रुपयांच्या ठेवी जमा होत आहेत. त्याला केवळ २०१९, २०२१ आणि २०२२ या तीन वर्षांचाच अपवाद होता. त्या वर्षांत कोरोना महासाथीमुळे प्रवास बंद असल्याने ठेवी कमी जमा झाल्या. बँकेतील ठेवींवरील व्याजापोटी ट्रस्टला वर्षाला १६०० कोटी रुपये मिळतात.

तिरुपतीचे भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिर देशविदेशात प्रसिद्ध आहे. त्यावर भक्तांचा गाढ विश्वास आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो भाविक तेथे भेट देऊन देवाचे दर्शन घेतात. तेथे देवाला आपले केस अर्पण करण्याची प्रथा आहे. त्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर पैसे आणि सोनेही देवाला दान दिले जाते. त्यातून या देवस्थानच्या बँक खात्यांत प्रचंड संपत्ती जमा झाली आहे.

सध्या या देवस्थानकडील सोन्याचा साठा ११,३२९ किलो इतका झाला आहे. त्याची किंमत ८,४९६ कोटी रुपये आहे. गेल्या काही वर्षांत सोन्याची किंमत बरीच वाढत गेली आहे. तरीही त्याचा तिरुपती मंदिरात सोने दान देण्यावर फरक पडलेला दिसत नाही. उलट देवस्थानकडील सोन्याचा साठा वाढतच चालला आहे. देवस्थानकडे २०२३ या वर्षात १०३१ किलो सोने जमा झाले. त्याची किंमत ७७३ कोटी रुपये होती.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण