काळजाचा थरकाप! यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या बसला आग, ९ जणांचा मृत्यू, चालक-वाहकावर प्रवाशांचा गंभीर आरोप (Photo-X)
राष्ट्रीय

काळजाचा थरकाप! यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या बसला आग, ९ जणांचा मृत्यू, चालक-वाहकावर प्रवाशांचा गंभीर आरोप

काही प्रवाशांनी चालक आणि वाहकाला बस तपासण्यासाठी थांबवण्याची विनंती केली. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे यमुना एक्स्प्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग लागून एका महिलेसह नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी जखमी झाले. बुधवारी (दि. २३) रात्री दिल्लीतील काश्मिरी गेटहून महोबाच्या दिशेने जाणाऱ्या राज कल्पना ट्रॅव्हल्सच्या बसला जेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आग लागली. बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. दरम्यान, आग लागण्यापूर्वी बसमधून जळल्याचा वास येत असल्याची माहिती प्रवाशांनी चालक आणि वाहकाला दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा गंभीर आरोप एका प्रवाशाने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी चालक आणि वाहकाला अटक करण्यात आली आहे.

बसमधून जळल्याचा वास

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, सुनील कुमार हे दिल्लीतील काश्मिरी गेट येथून हमीरपूर जिल्ह्यातील राठ येथे जाण्यासाठी राज कल्पना ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसले होते. रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास बस यमुना एक्स्प्रेसवेवरील ३३ व्या किलोमीटरजवळ पोहोचली असता चालकाच्या केबिनच्या दिशेने काहीतरी जळत असल्याचा तीव्र वास प्रवाशांना जाणवला.

काही प्रवाशांनी चालक आणि वाहकाला याबाबत माहिती देत बस थांबवून तपासणी करण्याची विनंती केली. मात्र, बसमधून असा वास यापूर्वीही येत असल्याचे सांगून चालकाने प्रवाशांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

चालक-वाहकावर गंभीर आरोप

तक्रारीनुसार, चालक आणि वाहक बसच्या केबिनमध्ये धूम्रपान करत होते. प्रवाशांनी जळण्याचा वास येत असल्याचे सांगूनही दोघांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

काही वेळाने चालकाच्या आसनाजवळ आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. त्यानंतर प्रवाशांनी आरडाओरड करत बस थांबवण्याची मागणी केली. यावेळी चालक आणि वाहकाने प्रवाशांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत "मरायचं असेल तर मरा, बस थांबवणार नाही", असे म्हटल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आल्याचे वृत्त आहे.

आगीचे रौद्ररूप

बसला आग लागल्यानंतर काही वेळातच धूर संपूर्ण प्रवासी भागात पसरला आणि आगीने रौद्ररूप धारण केले. बस थांबल्यानंतर अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून बाहेर उड्या मारल्या. बचाव पथकांनीही बसच्या खिडक्या फोडून प्रवाशांना बाहेर काढले. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुमारे २० ते २५ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

मात्र, आगीचा वेग आणि दाट धुरामुळे काही प्रवासी बसमध्येच अडकले. नऊ जणांचा होरपळून आणि धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

जखमींवर रुग्णालयात उपचार

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि जेवर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चार अग्निशमन गाड्या आणि बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना जेवर येथील कैलाश रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात नऊ जणांना मृत घोषित करण्यात आले.

बसच्या छतावरही सामान

प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात सामान होते. बसच्या लगेज कंपार्टमेंटसोबतच छतावरही सामान ठेवण्यात आले होते. आगीच्या वेळी या सामानामुळे प्रवाशांच्या बाहेर पडण्यास अडथळा निर्माण झाला का, याचाही तपास केला जात आहे. आगीमध्ये प्रवाशांचे सामान, मोबाईल फोन आणि इतर वस्तू जळून खाक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

AC मध्ये स्पार्क झाल्याचा प्राथमिक अंदाज

दरम्यान, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. ग्रेटर नोएडा पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, बसच्या AC यंत्रणेत स्पार्क किंवा ब्लास्ट झाल्याने इंजिनमधील ल्युब्रिकंट ऑइलने पेट घेतला असावा आणि त्यानंतर आग वेगाने पसरली असण्याची शक्यता आहे. मात्र, आगीचे अंतिम कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

चालक-वाहकाला अटक

या दुर्घटनेनंतर पोलिसांनी बसचा चालक आणि वाहकाला अटक केली आहे. प्रवाशांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाले का, बसमध्ये धूम्रपान केले जात होते का आणि आग लागल्यानंतर प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी पुरेशी संधी व सुरक्षा व्यवस्था उपलब्ध होती का, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणी जेवर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

या दुर्घटनेनंतर लांब पल्ल्याच्या स्लीपर बसमधील अग्निसुरक्षा, आपत्कालीन बाहेर पडण्याची व्यवस्था, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध साधने आणि बसमध्ये सामान वाहतुकीच्या नियमांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर प्रवाशांनी आग लागण्यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यांकडे चालक आणि वाहकाने दुर्लक्ष केले का, याचाही तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या दुर्घटनेतील निष्काळजीपणा आणि जबाबदारीबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Ulhasnagar : स्वीकृत नगरसेवक निवडीला पुन्हा ‘ब्रेक’! आठ महिन्यांची प्रतीक्षा आणखी वाढली

ठाणे शहराला साथीच्या आजारांचा विळखा! दोन महिन्यांत मलेरियाचे २०८, तर डेंग्यूचे १३८ रुग्ण

Karad : सामाजिक वनीकरणातील घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करा; वडूज न्यायालयाचे आदेश

Raigad : जिल्हा परिषद अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोरीच्या जाळ्यात

Murbad : १ लाख ३४ हजार मतदारांची नावे वगळली; नव्या प्रारूप मतदार यादीत २७.३२ टक्के मतदारांची घट