गुवाहाटी : आसाममधील गायक तथा अभिनेते झुबीन गर्ग यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी आसाम पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) गर्ग यांच्या मृत्यूनंतर तब्बल तीन महिन्यांनी शुक्रवारी गुवाहाटीच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
मूळचे आसामचे असलेले ५२ वर्षीय गायक झुबीन गर्ग २० आणि २१ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये आयोजित नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलसाठी सिंगापूरला गेले होते. या फेस्टिव्हलमध्ये झुबीन परफॉर्मही करणार होते. मात्र, सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झुबीन यांचा विचित्र अपघात झाला. अपघातानंतर त्यांना समुद्रातून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, तिथे सीपीआरही देण्यात आला, परंतु, सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
चार जण अटकेत
हे मृत्यूप्रकरण सुरुवातीपासून संशयाच्या फेऱ्यात अडकले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी सुरुवातीलाच या घटनेला हत्या घोषित केले. ते म्हणाले, पहिल्या दिवसापासूनच हे हत्येचे प्रकरण होते. या प्रकरणातील आरोपी श्यामकानू महंत, सिद्धार्थ शर्मा, अमृतप्रवा महंत आणि शेखर ज्योती गोस्वामी या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, आसाम पोलिसांची एसआयटी झुबीन यांच्या मृत्यूशी संबंधित गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या आणखी एका प्रकरणाचा तपास करत आहे. यामध्ये गुन्हेगारी कट रचणे, हत्येचा आरोप नसलेला सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणणे असे आरोप आहेत. या गुन्ह्यात हत्येचे आरोपही समाविष्ट आहेत.
पुरावे सादर
आसाम पोलिसांनी हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले आणि नंतर एसआयटी स्थापन केली. आरोपपत्रात गुन्हेगारी कट रचणे, निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे, गैरहत्या अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसआयटीने आरोपपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्र आणि पुरावे सादर केले आहेत.