नवी मुंबई

धर्मादाय रुग्णालयांकडून नियमांची पायमल्ली; नवी मुंबईतील मनसेच्या आरोग्यसेवकांचा आरोप

Swapnil S

नवी मुंबई : धर्मादाय रुग्णालयात निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दरातील उपचार सुलभरीत्या मिळावेत. तसेच या रुग्णालयात उपलब्ध असलेल्या खाटा आणि उपचाराचे दर याबाबतची माहिती निर्धन आणि दुर्बल घटकातील नागरिकांना उपलब्ध व्हावी याकरिता मनसेचे जुईनगरमधील आरोग्यसेवक अजय मोरे यांनी नवी मुंबई महापालिका मुख्य आरोग्य अधिकारी आणि धर्मादाय आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे; मात्र नवी मुंबईतील अनेक धर्मादाय रुग्णालयात याबाबतच्या नियमांना बगल दिली जात असल्याचे समोर आले आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशांकित योजनेनुसार, धर्मादाय रुग्णालयांनी पात्र असलेल्या गरीब, निर्धन, बेघर, अनाथ आणि दुर्बल घटकातील रुग्णांवर मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी रुग्णालयाच्या एकूण बेड क्षमतेच्या दहा टक्के खाटा निर्धन रुग्णांसाठी आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी दहा टक्के खाटा राखीव ठेवणे आवश्यक आहे. तसेच तेथील सामाजिक कार्यकर्ते असलेल्या कर्मचाऱ्यांनी अशा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत आपुलकीने बोलावे आणि त्यांच्याबरोबर चांगली व सहानुभूतीपूर्वक वर्तणूक ठेवावी, असे आदेश दिलेले आहेत; मात्र, अनेक धर्मादाय रुग्णालयांत पात्र असलेले रुग्ण उपचारासाठी आले असता सध्या खाट उपलब्ध नाही, असे सांगितले जाते, त्यांना उच्च न्यायालयाच्या योजनेचा लाभ न घेता आल्यामुळे ते उपचारापासून वंचित राहतात.

त्यामुळे उच्च न्यायालयाच्या योजनेचा भंग होत आहे, असे होऊ नये म्हणून राज्याचे तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य आधार ॲप सुरू केला आहे, ज्याच्या एका क्लिकवर रुग्णांना राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांतील उपलब्ध असलेल्या राखीव खाटांची माहिती उपलब्ध होत आहे. तसे असले, तरी सर्वच रुग्ण व त्यांचे नातेवाईक टेक्नोसाव्ही नसल्याने सदरची माहिती जाणून घेण्याकरिता सर्व धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयाच्या दर्शनी भागात राखीव खाटांच्या उपलब्धतेची माहिती तसेच उपचारांचे दरफलक दररोज दर्शवावेत. याबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र, त्यांचा मोबाईल बंद असल्याने आधी संपर्क होऊ शकला नाही. तसेच संपर्क झाल्यावर थेट मोबाईलवर माहिती न देता ठाणे येथील धर्मादाय कार्यालयात येऊन माहिती घ्यावी, असे सांगण्यात आले.

नवी मुंबईतील रुग्णालयांच्या नामफलकावर धर्मादायचा उल्लेख नाही !

नवी मुंबईत आठ धर्मादाय रुग्णालये आहेत, त्यातील राखीव खाटांची संख्या ३९८ आहे. पण यातील बरीच रुग्णालये उच्च न्यायालयाच्या योजनेतील खाटांचा आणि उपचार दरांचा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावत नाहीत, तसेच त्यांच्या नामफलकावर धर्मादाय किंवा चॅरीटी असा उल्लेख करत नाहीत, असे आढळून आले आहे. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे आरोग्यसेवक अजय मोरे यांनी केली आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त