नवी मुंबई : स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणून सादर करत भोंदूगिरीच्या माध्यमातून कोट्यवधींची संपत्ती उभारल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात यांच्या कथित काळ्या साम्राज्याचे धागेदोरे आता पनवेल तालुक्यातील शिरढोण गावापर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खरात यांनी कथित काळी कमाई गुंतवण्यासाठी शिरढोण गावातील जमिनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या. विशेष म्हणजे या जमिनी थेट त्यांच्या नावावर न घेता नातेवाईकांच्या नावावर घेतल्याचे समोर आले असून संबंधित सातबाऱ्यावरही त्याची नोंद झाल्याची माहिती आहे.
या व्यवहारांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा असून, या निधीचा स्रोत संशयास्पद असल्याचा आरोप केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे व्यवहार अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आले असून महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी नियमांना बगल देत या प्रक्रियेला मदत केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सामान्य नागरिकांची कामे महिनोनमहिने
रखडतात, मात्र काही दिवसांत एवढ्या मोठ्या व्यवहारांची
पूर्तता होते, हे आश्चर्यकारक आहे,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.
पनवेल परिसरातील वाढत्या रिअल इस्टेट दरांचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या संपूर्ण प्रकरणातील आर्थिक व्यवहार, निधीचा उगम आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका याबाबत सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, जागरूक नागरिक आणि ग्रामस्थांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.