नवी मुंबई

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण: मृत ठिकाणाची न्यायालयाने पाहणी करावी ,१६ फेब्रुवारीला होणार निर्णय

स्पॉट व्हिजिटचा प्रकार हा दुर्मिळ असला तरी त्यामुळे अनेक पुराव्यांचा उलगडा होणार आहे

Swapnil S

नवी मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची आरोपी अभय कुरुंदकर याने ज्या घरात हत्या केली आणि ज्या वसई खाडीमध्ये त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली, त्या ठिकाणांना न्यायालयाने प्रत्यक्ष भेट द्यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गेल्या सुनावणीदरम्यान पनवेल सत्र न्यायालयात केली होती. त्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली असून स्पॉट व्हिजिटबाबत येत्या १६ फेब्रुवारी रोजी निर्णय घेण्यात येणार असल्याचे न्या. पालदेवार यांनी सांगितले. स्पॉट व्हिजिटचा प्रकार हा दुर्मिळ असला तरी त्यामुळे अनेक पुराव्यांचा उलगडा होणार आहे, असे फिर्यादी पक्षाच्या बाजूने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरने ११ एप्रिल २०१६ रोजी मीरारोड येथील घरात हत्या केली. त्यानंतर त्याने अश्विनी यांच्या मृतदेहाचे लाकडे कापण्याच्या कटरने लहान लहान तुकडे केले. या तुकड्यांची विल्हेवाट वसई खाडीमध्ये लावण्यात आली. त्यानंतर अश्विनी जिवंत आहे हे भासवण्यासाठी कुरुंदकरने स्वत: अश्विनी यांचा मोबाईल फोन हाताळून त्यावरून मेसेज पाठवले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी सर्व तांत्रिक पुरावे जमा केले आहेत. त्यामुळे न्यायालयाने ठरावीक ठिकाणांना भेट देणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद शुक्रवारी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात केला. यावर आरोपींच्या वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार हे येत्या १६ फेब्रुवारी रोजी यावर निर्णय घेणार आहेत.

मोबाईलच्या नेटवर्कमध्ये एका ठिकाणाची दोन नावे

अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा तपास हा तांत्रिक पुराव्यांवर आधारित आहे. कुरुंदकरचे ठाणे येथील कार्यालयाचे लोकेशन वेगवेगळ्या नेटवर्कमध्ये वेगवेगळे दाखवण्यात आले आहे. एका नेटवर्कमध्ये हे कार्यालय खारकर आळी परिसरात तर दुसऱ्या नेटवर्कमध्ये हे ठिकाण कोर्ट नाका भागात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाने या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट दिली तर वास्तविकता समोर येईल. आरोपींकडे वेगवेगळे नेटवर्क असलेले मोबाईल होते, त्यामुळे नेटवर्कमध्ये लोकेशनचे परिसर वेगवेगळे असल्याने स्पॉट व्हिजिट महत्त्वाची आहे, असे मत प्रदीप घरत यांनी व्यक्त केले आहे.

८४ साक्षीदारांच्या साक्ष पूर्ण

अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्यात न्यायालयाने आतापर्यंत ८४ साक्षीदार तपासले आहेत. आता सर्वच साक्षीदार संपले असल्याने विशेष सरकारी वकील यांनी साक्षीदार संपले असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता या खटल्याची सुनावणी थांबवली आहे. यानंतर न्यायालयाकडून आरोपींचे जबाब नोंदविण्याचे काम करण्यात येणार आहे. या खटल्यात सुमारे ९०० पानांची साक्ष न्यायालयात जमा झालेली आहे. विरोधात आलेल्या सर्वच साक्षीवर प्रश्नावली तयार करून हे प्रश्न आरोपींना विचारले जाणार आहेत. हे कामकाज सुमारे महिनाभर चालणार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी