संग्रहित छायाचित्र  
नवी मुंबई

भूखंडाच्या वापरात बदल केल्याने सिडकोचे ७०० कोटींचे नुकसान; विकासक व अधिकाऱ्यांच्या संगनमताचा परिणाम

बेलापूर येथील तारांकित हॉटेलसाठी राखीव असलेल्या भूखंडाचा बिल्डरला वाणिज्य वापरासाठी बदल करण्यास अखेर सिडको अधिकाऱ्यांनी मंजूरी दिली. याप्रकरणात सिडको अधिकाऱ्यांनी विकासकाशी संगनमत केल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत.

Swapnil S

नवी मुंबई : बेलापूर येथील तारांकित हॉटेलसाठी राखीव असलेल्या भूखंडाचा बिल्डरला वाणिज्य वापरासाठी बदल करण्यास अखेर सिडको अधिकाऱ्यांनी मंजूरी दिली. याप्रकरणात सिडको अधिकाऱ्यांनी विकासकाशी संगनमत केल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत. सिडको व्यवस्थापनाने कवडीमोल भावात सदर भूखंडाच्या वापर बदलास मान्यता दिल्यामुळे सिडकोचे सुमारे ७०० कोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

तर मुंबई उच्च न्यायालयाने या भूखंडाच्या वापरात बदल करण्यास परवानगी दिल्याने आम्ही त्या निर्णयाची अंमलबजावणी केल्याचे सिडको अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा भूखंड सिडकोने वाणिज्य वापरासाठी निविदेद्वारे विक्रीस काढला असता तर सिडकोला १२०० कोटींहून अधिक रक्कम प्राप्त झाली असती, असे नवी मुंबईतील विकासकांचे म्हणणे आहे.

सिडकोत भ्रष्टाचाराची नवी दुकाने सुरु

दरम्यान, सिडको संचालक मंडळाचा भूखंड वापर बदल ठरावाचा फायदा घेत तारांकित हॉटेल उभारणीसाठी विक्री केलेले भूखंड राज्यकर्ते व अधिकाऱ्यांना हाताशी धरुन वाणिज्य अथवा निवासी वापराखाली आणण्याचा विकासकांचा मार्ग मोकळा झाला आहे. तारांकित हॉटेलसाठी विक्री केलेल्या भूखंडाचा कवडीमोल भावात वापर बदल करुन ते भूखंड निवासी अथवा वाणिज्य वापरात आणण्यासाठी भ्रष्टाचाराची नवी दुकाने सिडकोत सुरु झाल्याचे आरोप होऊ लागले आहेत.

२००८ साली सिडकोने पामबीच मार्गावर एनआरआय कॉम्प्लेक्स समोर सेक्टर-४६ मध्ये ४७ हजार चौ.मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अविनाश भोसले यांच्या मेट्रो पोलिस हॉटेलला १८० कोटी रुपयास निविदेद्वारे दिला होता. मात्र त्या भूखंडावर हॉटेल न उभारता अविनाश भोसले यांनी सदर भूखंड दोन तुकड्यांमध्ये भिन्न विकासकांना ९०० कोटीहून अधिक रक्कमेला विकला असून त्या बिल्डर्सना निवासी व वाणिज्य वापराकरिता भूखंड वापर बदलाची परवानगी सिडकोने दिली आहे.

त्याचपद्धतीने पीव्हीपी व्हेंचर्स या हाँगकाँग स्थित कंपनीला सिडकोने बेलापूर किल्ला परिसरात पंचतारांकित हॉटेल उभारणीसाठी भूखंड घेतला होता. मात्र या कंपनीने ‘स्टार हॉटेल’ची उभारणी न करता सदर भूखंड नवी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाला विकला. त्यानंतर या बांधकाम व्यावसायिकाने सदर भूखंडाच्या वापरात बदल करण्याकरिता राज्यकर्त्यां द्वारे सिडकोवर गत तीन वर्षापासून दबाव सुरू ठेवला होता. अखेर त्या बांधकाम व्यावसायिकाला भूखंडाचा वापर बदल करून घेण्यात नुकतेच यश आले आहे.

सिडकोची दुटप्पी भूमिका कोणाच्या फायद्यासाठी

भूखंडाचा वापरात बदल करण्याचे सिडको संचालक मंडळाने मंजूर केलेले धोरण व्यवस्थापनाने भ्रष्टाचार करण्याकरिता जाणून बुजून रद्द केलेले नाही. त्यामुळे तारांकित हॉटेलकरिता भूखंड पीस काढायचे आणि मग सदर भूखंड कवडीमोल भावात वापर बदल करून भ्रष्टाचारी मार्गाने त्या भूखंडाचा वापर बदल करण्यास मान्यता द्यायची हेच उद्योग काही वर्षापासून सिडकोत सुरू आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचाराला व्यसन घालण्याचे धारिष्टय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवणार का असा प्रश्न नवी मुंबईकरांनी उपस्थित केला आहे.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन