स्वत: च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे जलसमृध्द शहर अशी नवी मुंबई शहराची ओळख आहे. यावर्षी खूप उशीरा पावसाळा सुरु झाल्याने काही शहरांनी पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यावतीने नागरिकांना करण्यात आले होते. मोरबे धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.
सद्यस्थितीत मागील ५ दिवसात ६०६.८० मि.मि. इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने मोरबे धरणाच्या पाणीसाठ्यात ७०.०२ एम.सी.एम. इतका पाणीसाठा झाला आहे. यामुळे आतापर्यंत मोरबे धरणातील जलसाठ्यात १७.८२ एम.सी.एम. इतकी वाढ झालेली आहे. अलीकडेच मुसळधार झालेल्या पावसामुळे नवी मुंबईतील नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या महानगरपालिकेच्या मोरबे धरण प्रकल्पात ३ जुलै रोजी २७.३४ टक्के म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका जलसाठा झाला. तर 4 जुलैपासून ८ तारखेपर्यंत संततधार पर्जन्यवृष्टीमुळे जलसाठा ३६.६८ टक्के इतका झालेला असल्याने मागील ५ दिवसात झालेली ९.३४ टक्के इतकी लक्षणीय वाढ झाल्याने सद्यस्थितीत ५ डिसेंबर २०२२ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा मोरबे धरणात झालेला आहे.