ऑक्टोबरच्या अखेरीस परतीच्या पावसावर चक्रीवादळाचं सावट घोंगावत असून, त्यामुळे मुंबईत पुन्हा पावसाने जोर धरला आहे. मंगळवार (दि. २८) सकाळपासूनच दक्षिण मुंबईतील ब्रिच कँडी, नरिमन पॉईंट, फोर्ट या भागांमध्ये जोरदार सरींनी मुंबईकरांना झोडपलं. काही भागांत गडगडाटासह वाऱ्यांचे झोतही जाणवले. भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ३० ऑक्टोबरपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. हवामान खात्यानुसार, पुढील काही तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
दक्षिण मुंबईत मुसळधार सरी
मंगळवारी सकाळपासूनच दक्षिण मुंबईत पावसाचा जोर कायम राहिला. फोर्ट परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती नागरिकांनी सोशल मीडियावर दिली. तर ब्रिच कँडी आणि वरळी भागात रस्त्यांवर पाणी साचल्याचे दृश्य दिसले. अनेकांनी “मुंबईत परतला पाऊस!” अशा पोस्ट्स सोशल मीडियावर शेअर केल्या.
मुंबईतील हवामान निरीक्षक ऋषिकेश आग्रे यांनी सांगितले की, “सध्या दक्षिण मुंबईत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर पश्चिम उपनगर आणि मध्य मुंबईत वाढू शकतो.”
तापमानात घट, हवेत गारवा
या अवेळी सरींमुळे शहरातील तापमानात घट झाली आहे. हवेत गारवा निर्माण झाला असून, प्रदूषणातही सुधारणा झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज मुंबईत कमाल तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील.
हवेची गुणवत्ता सुधारली
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, कुलाबा येथील AQI १४२ इतका नोंदविला गेला असून तो ‘मध्यम’ श्रेणीत आहे. नेव्ही नगर, माझगाव आणि वरळी भागांमध्ये अनुक्रमे ६१, ७६ आणि ६३ इतका AQI नोंदला गेला आहे. तर वरळीतील सिद्धार्थ नगर भागात AQI ४९ इतका ‘चांगला’ श्रेणीत आहे.
चक्रीवादळ ‘मॉन्था’चं संकट
दरम्यान, बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळ ‘मॉन्था’ सक्रीय झालं आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आज (दि. २८) सायंकाळी किंवा रात्री आंध्र प्रदेशातील मच्छलिपटनम आणि कालींगपट्टणमदरम्यान किनाऱ्यावर धडकणार आहे.
चक्रीवादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग ९० ते १०० किमी प्रतितासपर्यंत पोहोचेल, तर काही ठिकाणी तो ११० किमी प्रतितासापर्यंत जाऊ शकतो. या प्रणालीमुळे किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच २९ ऑक्टोबर रोजी ओडिशामध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
नागरिकांना इशारा
हवामान खात्याने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आणि विजांच्या कडकडाटादरम्यान उघड्यावर न थांबण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत परतीचा पाऊस आणि चक्रीवादळाचा प्रभाव एकत्र येत असल्याने, पुढील दोन दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.