नवी मुंबई : घणसोली सेक्टर-४ मधील सिडकोच्या मालकीच्या भूखंडांवर अनधिकृत ताबा मिळवून बुकिंग ऑफिस थाटत सदनिकांची विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भूखंड क्रमांक ३०१ ते ३०७ आणि ३०८ ते ३११ अद्याप कोणत्याही विकासकाला वितरित केलेले नसल्याची माहिती सिडकोने माहिती अधिकारांतर्गत दिली आहे. असे असतानाही या जागांवर पत्रे लावून ‘सृष्टी व्हेंचर’ आणि ‘कृष्णा इंपिरियल’ या नावांनी सदनिकांची विक्री सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे.
भूखंड क्रमांक ३०८ ते ३११ येथे सात मजली इमारतीत ३५ सदनिका प्रस्तावित असून, त्यापैकी १५ सदनिकांची विक्री झाल्याची माहिती समोर आल्याचा दावा मनसेने केला आहे.
सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी आणि हक्काच्या घराच्या स्वप्नाशी खेळ सुरू आहे. सिडकोने तातडीने कारवाई करून या प्रकाराला आळा घालावा; अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.गजानन काळे, नवी मुंबई शहर अध्यक्ष मनसे
सिडको प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
गजानन काळे यांनी सिडकोचे पणन व्यवस्थापक (वाणिज्य) विनू नायर यांना लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे सिडको प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित भूखंडांवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.